EVM विरोधात महाविकास आघाडी आक्रमक; कोर्टात जाण्याची तयारी

0
30

EVM विरोधात महाविकास आघाडी आक्रमक झाल्याचं पहायला मिळतंय. EVM विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष मोठं आंदोलन उभारण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय.

विधानसभा निवडणुकातल्या धक्कादायक पराभवानंतर ईव्हीएम विरोधी लढाईसाठी मविआ सज्ज झालीये. शरद पवार यांनी पराभूत उमेदवारांच्या बोलावलेल्या बैठकीत ईव्हीएम आणि एकूणच मतांची गोळाबेरीज जुळत नसल्याची तक्रार करण्यात आली. राज्यपातळीवर आणि केंद्रीय पातळीवर ईव्हीएमविरोधात कायदेशीर लढाई लढण्यासाठी वकिलांची टीम गठीत करण्यात येणार आहे. ईव्हीएमबाबत आक्षेप किंवा निवडणूक प्रक्रियेतील चुकीच्या बाबींबातचे पुरावे गोळा करण्याच्या सूचना शरद पवारांनी उमेदवारांना दिल्या आहेत.ईव्हीएममुळे भारताचा रशिया होणार असल्याचा इशारा जितेंद्र आव्हाड यांनी दिलाय.

उद्धव ठाकरेंनी बोलावलेल्या बैठकीतही पराभूत उमेदवारांनी ईव्हीएमबाबत आक्षेप नोंदवले. सर्व आक्षेप ऐकल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष मोठं आंदोलन करण्याच्या तयारीत आहे.

येत्या 28 तारखेपर्यंत व्हीव्हीपॅट तपासणी करण्याची सूचनाही शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी उमेदवारांना दिल्यात. येत्या दोन दिवसात ईव्हीएमविरोधात महाविकास आघाडीची पुढील आपली रणनिती स्पष्ट करेल,असं काँग्रेस नेते नसीम खान यांनी म्हटलंय.

ईव्हीएमविरोधात विरोधकांनी लढ्याची तयारी सुरु केलेली असतानाच सुप्रीम कोर्टानं ईव्हीएमऐवजी बॅलेटवर निवडणूक घेण्याची मागणी फेटाळलीय. विधानसभा निवडणुकीतला पराभव विरोधकांनी स्वीकारलाय. पण त्यांच्या मनात ईव्हीएमबाबत अनेक शंका आहेत. त्यामुळंच ईव्हीएमविरोधात कायदेशीर आणि रस्त्यावरचा लढा लढण्यासाठी विरोधकांनी जमवाजमव सुरु केलीय.

Spread the love