प्रतिनिधी – जितेंद्र काटे
भुसावळ – येथून जवळच असलेल्या गोंभी – वांजोळा रस्त्यावर एका जिवंत निंबाच्या झाडाची कत्तल करण्यात आली असल्याने या परिसरात वृक्षतोडी ने पुन्हा डोके वर काढले की काय ? असा प्रश्न निर्माण झाला असून वनविभाग व बांधकाम खात्याने लक्ष द्यावे अशी मागणी केली जात आहे.
या बाबत माहिती अशी की, गोंभी – वांजोळा रस्त्यावर वांजोळा गावाकडून गोंभी गावाकडे येताना उजव्या बाजूला ऊसाच्या शेताला लागून असलेल्या बांधावर निंबाचे जूने मोठे झाड होते हे झाड कापण्यात आले असून लाकूड कापण्याच्या मशिनने या झाडाचे वाहनात भरण्यात येतील अशा आकाराचे ओंडके तयार करून ठेवण्यात आले आहेत. या बाबत शेजारी गुरे चारणाऱ्या गुराख्यांना विचारले असता कोणी झाड तोडले या बाबत माहिती नसल्याचे सांगितले त्यामुळे नेमका काय प्रकार आहे याची चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली जात असून काही दिवसांपासून लाकूड व्यावसाय करणारे या परिसरात फिरताना दिसत आहेत.
कत्तल करण्यात आलेले हे निंबाचे झाड वांजोळा गावाकडून गोंभी गावाकडे येताना ज्या ठिकाणी सिमेंट रस्ता सुरु होतो त्या ठिकाणी असून हे झाड सार्वजनिक बांधकाम खात्याच्या हद्दीत आहे की काय ? याची खात्री सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांनी करावी तसेच वनविभागाने अधिकारी व कर्मचारी यांनी सुध्दा या परिसरात जाऊन चौकशी करावी अशी मागणी केली जात आहे.