लाडक्या बहिणींना 2500 रुपये मिळणार, 1 हजार रुपये वाढवले, हेमंत सोरेन यांनी शपथ घेताच पहिला निर्णय घेतला

0
20

रांची – : झारखंडचे मुख्यमंत्री म्हणून हेमंत सोरेन यांनी शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्याला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह इंडिया आघाडीचे इतर नेते उपस्थित होते.

झारखंडचे मुख्यमंत्री म्हणून हेमंत सोरेन यांनी चौथ्यांदा शपथ घेतली. यानंतर हेमंत सोरेन यांनी मैय्या सन्मान योजनेच्या रकमेत वाढ करण्याचा निर्णय घेतला. महिलांना दिली जाणारी रक्कम वाढवून ती 2500 रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला.

लाडक्या बहिणींना 2500 रुपये मिळणार 

झारखंडच्या मंत्रिमंडळातील इतर मंत्र्यांचा शपथविधी सोहळा न होता केवळ काल हेमंत सोरेन यांचा शपथविधी झाला. झारखंडच्या मंत्रिमंडळाची संख्या 12 इतकी आहे. राज्यपाल संतोष गंगवार यांनी रांचीतील मैदानावरील आयोजित कार्यक्रमात हेमंत सोरेन यांना पद आणि गोपनियतेची पथ दिली. शपथविधीनंतर हेमंत सोरेन यांनी प्रशासनातील अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीत मैय्या सन्मान योजनेतील रक्कम एक हजार रुपयांनी वाढवण्याचा निर्णय घेतला असून महिलांना आता दरमहा 2500 रुपये मिळणार आहेत. डिसेंबर महिन्यापासून महिलांना 2500 रुपये मिळतील.

केंद्र सरकारकडून 1.36 लाख कोटी रुपये मिळवण्यासाठी कायदेशीर पर्यायांचा वापर करणार असल्याचे संकेत देखील हेमंत सोरेन यांनी दिले. महसूल विभागातर्फे खाणींवरील कर वाढवण्याचा निर्णय देखील घेतला गेला आहे.

सध्या केवळ हेमंत सोरेन यांचा शपथविधी पार पडला आहे. हेमंत सोरेन यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार डिसेंबर महिन्यात होण्याची शक्यता आहे. हेमंत सोरेन यांनी झारखंड मुक्ती मोर्चाचे आमदार स्टीफन मरांडी यांना प्रोटेम स्पीकर म्हणून नियुक्त केलं आहे. ते 9 ते 12 डिसेंबर दरम्यान विधानसभेचं विशेष सत्र आयोजित करतील. झारखंडच्या विधानसभेची सदस्यसंख्या 81 इतकी आहे.इंडिया आघाडीला झारखंडमध्ये 56, भाजपला 24 आणि इतरांना 1 जागेवर विजय मिळाला होता.झारखंडमधील शपथविधी सोहळ्यापूर्वी हेमंत सोरेन यांनी दिल्लीचा दौरा केला होता. या दौऱ्यामध्ये त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती.

दरम्यान, महाराष्ट्रात देखील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु असून महायुती सरकारनं विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात महिलांना दरमहा 2100 रुपये देण्याची घोषणा केली होती. महाराष्ट्रातील महिलांना या योजनेनुसार नोव्हेंबरपर्यंतची रक्कम मिळाली आहे. महिलांना 7500 रुपये मिळाले असून डिसेंबर महिन्याची रक्कम मिळताना ती 1500 रुपयांप्रमामं मिळणार की 2100 रुपयांप्रमाणं मिळणार हे पाहावं लागेल.

Spread the love