जळगाव संदेश न्यूज नेटवर्क
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून जवळपास आठ दिवस झाले आहेत, पण अद्याप मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार ठरला नाही. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाचा दावा सोडल्यानंतर भाजपचा मुख्यमंत्री होणार, हे निश्चित झाले आहे.
पण, भापकडून कोणाला संधी मिळणार, हा सस्पेन्स कायम आहे. दरम्यान, भाजपचा मुख्यमंत्री झाल्यास शिंदेसेना आणि राष्ट्रवादीला उपमुख्यमंत्रीपद मिळणार आहे. पण, एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री व्हायला तयार नसल्याची माहिती समोर आली आहे. आता अशा परिस्थितीत शिंदे पक्षातील कोणत्या नेत्याला संधी देणार, हे पाहणे महत्वाचे आहे.
शिवसेनेच्या कोट्यातून उपमुख्यमंत्री कोण होणार, याची अंतिम घोषणा एकनाथ शिंदेच करतील, असे शिवसेना आमदार संजय शिरसाट यांचे म्हणणे आहे. शिंदे शुक्रवारी सायंकाळपर्यंत याबाबत घोषणा करू शकतात. मात्र, सध्या ते सातारा या त्यांच्या गावी गेले आहेत. आता ते नेमका काय निर्णय घेणार, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.
मुख्यमंत्री आणि एका उपमुख्यमंत्र्याचे नाव निश्चित
भाजपच्या कोट्यातून देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार असल्याची चर्चा आहे. याबाबतचा निर्णयही महायुतीत घेण्यात आला आहे. त्याची अधिकृत घोषणा विधिमंडळ पक्षाच्या बैठकीनंतर केली जाईल. तर, राष्ट्रवादीच्या कोट्यातून अजित पवार उपमुख्यमंत्री होणार, हे निश्चित आहे. अजित पवार याआधीही उपमुख्यमंत्री राहिले आहेत. अजित पवारांच्या नावावर सर्वाधिक काळ महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून काम करण्याचा विक्रम आहे.
एखाद्या माजी मुख्यमंत्र्याने मंत्री किंवा उपमुख्यमंत्री होणे, ही महाराष्ट्राच्या राजकारणात नवीन गोष्ट नाही. यापूर्वीही अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या अनेक नेत्यांनी हे केले आहे. अशा परिस्थितीत एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्री का व्हायचे नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. एकनाथ शिंदे एका पक्षाचे प्रमुख आहेत आणि त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री राहिले आहेत. त्यामुळेच त्यांना मुख्यमंत्रीपद नकोय, असे बोलले जात आहे.
शिंदे नाही तर कोण?
शिंदे नाही तर कोण, असा प्रश्न आहे. शिवसेनेचे (शिंदे) संजय शिरसाट यांच्या म्हणण्यानुसार, उपमुख्यमंत्री कोण होणार, हे एकनाथ शिंदेच ठरवतील. चर्चेत पहिले नाव आहे ते त्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांचे आहे. श्रीकांत सध्या लोकसभेचे खासदार आहेत. एकनाथ शिंदे स्वतः मुलाला उपमुख्यमंत्री बनवून आपला वारसा पुढे चालवू शकतात. जळगाव ग्रामीणचे आमदार गुलाबराव पाटील यांचेही नाव चर्चेत आहे. पाटील यांच्या परिसरात संभाव्य उपमुख्यमंत्र्यांचे पोस्टरही लावण्यात आले आहे. तर, उदय सामंत आणि दादा भुसे यांच्या नावाचीही राजकीय वर्तुळात चर्चा आहे. शिवसेनेतील बंडखोरीदरम्यान एकनाथ शिंदे यांच्या वतीने दीपक केसरकर आणि भरत गोगवाले यांनी मोठी भूमिका बजावली होती. शिंदे स्वतः उपमुख्यमंत्री न झाल्यास या दोघांपैकी एकाला संधी दिली जाऊ शकते.