अखेर ठरलं..! उद्याच होणार शपथविधी; पहा कुणाला किती मंत्रि‍पदे मिळणार, बंगलेही ठरले

0
20

महायुती सरकारचा शपथविधी होऊन दोन आठवडे उलटत आल्यानंतर अखेर मंत्रिमंडळाच्या विस्ताराला मुहूर्त मिळत आहे. उद्या म्हणजेच शनिवारी सकाळी ११ वाजता किंवा सायंकाळी चार वाजता नव्या मंत्र्‍यांचा शपथविधी होणार असल्याची माहिती मिळत आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाजपचे २१, शिवसेना शिंदे गटाचे १२ तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे १० मंत्री उद्या शपथ घेणार आहेत.

राजभवनात सुरु झाली तयारी

महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार शनिवारी होण्याची शक्यता असून राजभवनात शपथविधीच्या तयारीला सुरुवात झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. एकनाथ शिंदेंच्या नाराजीमुळे मंत्रिमंडळाचा विस्तार पुढे जाईल, अशी चर्चा होती. पसंतु आता शनिवारी हा शपथविधी होणार असल्याची माहिती मिळत आहे. नागपुरातील हिवाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं होतं. मंत्रीपदासाठी निवडलेल्या नावांवर दिल्लीत चर्चा झाल्याचं बोललं जात आहे.

शिवसेनेच्या संभाव्य मंत्र्यांची यादी

शिवसेनेचे 12 मंत्री शपथ घेण्याची शक्यता असून त्यामध्ये 9 कॅबिनेट तर 3 राज्यमंत्री असणार आहेत. अब्दुल सत्तार, तानाजी सावंत आणि संजय राठोड यांच्या नावाला भाजपचा विरोध असल्याची माहिती आहे. त्यामुळे या तिघांचा पत्ता कट होणार असल्याची माहिती समोर येत आहे. शिवसेनेकडून उदय सामंत, शंभूराजे देसाई, गुलाबराव पाटील, दादा भुसे, प्रताप सरनाईक, संजय शिरसाठ, भरत गोगावले, आशिष जयस्वाल तर राज्यमंत्रीपदासाठी योगेश कदम आणि विजय शिवतारे हे राज्यमंत्री पदाची शपथ घेतील. याशिवाय प्रकाश आबिटकर किंवा राजेंद्र पाटील यड्रावकर यापैकी एकाच्या मंत्रीपदाची शक्यताही व्यक्त केली जात आहे.

राष्ट्रवादीकडूनही तयारी सुरु

अजित पवार गटाला 10 मंत्रिपदे देण्यात येणार आहेत. त्यात 8 कॅबिनेट तर 2 राज्यमंत्रिपदे असणार आहेत. माजी मंत्री हसन मुश्रीफ, दिलीप वळसे पाटील यांनी अजित पवारांची देवगिरी निवासस्थानी भेट घेतली. तर त्याआधी माजी मंत्री धर्मराव बाबा अत्राम यांनीही अजित पवारांची भेट घेतली होती. त्याचवेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे देखील उपस्थिती असल्याची माहिती आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांची सध्या लाँबिंग सुरु असून अजित पवार काही नव्या चेहऱ्यांनाही संधी देणार असल्याचे बोलले जात आहे.

Spread the love