प्रतिनिधी – जितेंद्र काटे
भुसावळ -: तालुक्यातील वराडसिम ग्रामपंचायत कार्यालयात दि, २३ डिसेंबर रोजी झालेल्या मासिक सभेत उपसरपंच विजयसिंग उर्फ गजानन रविंद्र पाटील यांनी आपल्या उपसरपंच पदाचा राजीनामा दिला आहे. या राजीनामा पत्रावर जया रविंद्र पारधी व प्रकाश देविदास ठाकूर यांच्या साक्षीदार म्हणून सह्या आहेत. सर्वानुमते राजीनामा मंजूर करण्यात आला आहे.आता उपसरपंच पदासाठी कोणाची वर्णी लागणार याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागलेले असून ग्रामपंचायत सदस्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून गुलाबी थंडीचे दिवस असताना उपसरपंच पदासाठी वातावरण तापते की काय? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. आता दि.३० डिसेंबर रोजी विशेष सभा घेण्यात येऊन राजीनामा पडताळणी होऊन पुढे उपसरपंच पदाची निवड होण्याची शक्यता आहे.
वराडसिम येथील ग्रामपंचायत कार्यालयात एक वर्षासाठी उपसरपंच पद हे विजय पाटील यांच्या कडे होते एका वर्षानंतर राजीनामा द्यावा हे ठरले होते त्यानुसार कालावधी संपल्याने उपसरपंच विजय पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. शक्यतो राजकारणात दिलेला शब्द कोणी पाळत नाही मात्र उपसरपंच विजय पाटील यांनी दिलेला शब्द पाळल्याने राजकिय क्षेत्रात विजय पाटील यांचे पंचक्रोशीतून कौतूक केले जात आहे. आता उपसरपंच पदाची निवड सहजासहजी होणार की घोडेबाजार होत रस्सीखेच होणार याकडे वराडसिम ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.