जळगाव -: मुंबईला जाणाऱ्या पुष्पक एक्सप्रेसला आग लागल्याच्या भीतीने काही प्रवाशांनी गाडीतून उड्या मारल्या. पण समोरुन येणाऱ्या बंगळुरु एक्स्प्रेसने त्यांना चिरडल्याची घटना घडली. हा दुर्दैवी अपघात जळगावमधील परधाडे स्टेशनजवळ झाल्याची माहिती आहे.
या अपघातात आठ ते नऊ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे तसेच 40 हून अधिक प्रवासी जखमी असल्याची माहिती आहे . मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. या ठिकाणी बचावकार्य सुरू करण्यात आलं असून जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मुंबईकडे जाणाऱ्या पुष्पक एक्सप्रेसने अचानक ब्रेक लावल्याने त्या ठिकाणी आगीच्या ठिणग्या उडाल्या. त्यामुळे काही प्रवाशांना ही आग लागल्याची भीती व्यक्त केली. त्यामुळे भयभीत झालेल्या त्या प्रवाशांनी गाडीतून उड्या मारल्या. पण समोरून येणाऱ्या बंगळुरू एक्सप्रेसने अनेकांना चिरडल्याची माहिती आहे.
प्रत्यक्षदर्शीने काय सांगितलं?
बाबा जाधव हे या घटनेचे प्रत्यक्षदर्शी आहेत. त्यांनी सांगितलं की, परधाडे स्टेशनच्या आधी ट्रेनचा ब्रेक लागल्याने घर्षण झालं आणि आगीच्या ठिणग्या उडाल्या. त्यावेळी प्रवाशांनी उड्या मारायला सुरूवात केली. त्यामध्ये अनेकजण बंगळुरू एक्स्प्रेसच्या खाली आले.
काय म्हणाले जिल्हाधिकारी?
या अपघातात सहा ते आठ लोकांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती असल्याचं जळगावचे जिल्हाधिकारी म्हणाले. या संदर्भात रेल्वे प्रशासनाकडून मदत घेतली जात असून जखमींवर उपचार केले जात आहेत. या ठिकाणी बचाव पथक पोहोचल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं.
काय म्हणाल्या खासदार स्मिता वाघ?
या अपघातासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा झाली असून मदत कार्य लवकरात लवकर पोहोचवण्याचे निर्देश त्यांना दिले आहेत असं जळगावच्या खासदार स्मिता वाघ म्हणाल्या.
मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील निला यांनी या अपघातासंदर्भात माहिती दिली. स्थानिक प्रशासनाच्या मदतीने या ठिकाणी लवकरात लवकर वैद्यकीय मदत पोहोचवण्यासाठी प्रयत्नशील आहोत असं त्यांनी सांगितलं. या अपघातात नेमके किती मृत्यू झाले हे निश्चित सांगता येणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं.कसा झाला अपघात?
– जळगाववरुन मुंबईकडे येणाऱ्या पुष्पक एक्स्प्रेसचा अचानक ब्रेक लागल्याने आगीच्या ठिणग्या उडाल्या. त्यावेळी डब्यात आगीची चर्चा सुरू झाली.
– यावेळी काही प्रवाशांनी गाडीतून उड्या मारल्या.
– दुर्दैवानं समोरुन येणाऱ्या बंगळुरु एक्स्प्रेसची प्रवाशांना धडक बसली.
– या घटनेमध्ये अनेकांचा मृत्यू झाला. जखमींवर आता उपचार सुरू आहेत.