जालना – : पुलाचे काम करणाऱ्या मजुरांवर गाढ झोपेत असतानाच काळाने घाला घातला. जालन्यातील जाफराबाद तालुक्यातील पासोडी शिवारात शनिवारी (दि २२) पहाटे साडेतीनच्या सुमारास वाळूच्या ढिगाऱ्याखाली दबून ५ मजुरांचा मृत्यू झाला.
घटनेत एका १३ वर्षीय मुलीला वाचवण्यात यश आले आहे. पुलाच्या कामासाठी आणलेला वाळूचा टिप्पर चालकाने निष्काळजीपणे मजूर राहत असलेल्या पत्र्याच्या शेडवर रिचवला. त्यामुळे लोखंडी शेड खचून त्यात ७ मजूर वाळूत गाडले गेले. त्यापैकी ५ जणांचा मृत्यू झाला. तर एका १३ वर्षीय मुलीसह महिलेला वाचवण्यात यश आले आहे.
नेमकी घटना काय घडली?
जालन्यातील जाफराबाद तालुक्यातील पासोडी-चांडोळ रोडजवळील पुलाचे बांधकाम सुरू आहे. या पुलाच्या बांधकामासाठी हे मजूर आले होते. हे मजूर पुलाजवळ पत्र्याचे शेड करून तिथे राहत होते. दरम्यान, या पुलाच्या कामासाठी मागवलेल्या वाळूचा टिप्पर रात्री साडेतीनच्या सुमारास तिथे पोहोचला. टिप्पर चालकाने निष्काळजीपणाने मजूर झोपलेल्या पत्र्याच्या शेडवरच टिप्परमधील सर्व वाळू रिकामी केली. वाळूच्या ओझ्याने पत्र्याचा शेड खचून त्या वाळूखाली शेडमध्ये झोपलेले सर्व मजूर गाडले गेले. वाळूच्या ढिगाऱ्याखाली एकूण ७ जण दाबले जाऊन त्यापैकी ५ जणांचा मृत्यू झाला. तर एका महिलेसह १३ वर्षीय मुलीला वाचवण्यात यश आले, अशी माहिती सूत्रांनी दिली.
अशी आली घटना उघडकीस
हा प्रकार या पत्र्याच्या शेडसमोरील खोलीत झोपलेल्या महिलेच्या लक्षात आला. त्यानंतर तिने आरडाओरडा करत जवळपासच्या शेतकऱ्यांना माहिती दिली. थोड्याच वेळात संपूर्ण परिसरात माहिती पसरली. गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. आरडाओरडा ऐकून टिप्पर चालक फरार झाला. ग्रामस्थांनी ढिगाऱ्याखाली दबलेल्या मजुरांना बाहेर काढले. मात्र, त्यात ५ जणांचा मृत्यू झाला. ग्रामस्थांनी पोलिसांना घटनेविषयी माहिती देताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
घटनेतील मृतांची नावे अशी, सुपडू आहेर (वय 38) रा. तोंडापूर, ता. जामनेर, जि. जळगाव, गणेश काशिनाथ धनवई (वय 50) रा. गोळेगाव, ता. सिल्लोड, भूषण गणेश धनवई (वय 17) रा. गोळेगाव, ता. सिल्लोड, राजेंद्र दगडूबा वाघ (वय 40) रा. दहिद, ता. बुलढाणा, सुनील समाधान सपकाळ, (वय 20) रा. पद्मावती, ता. भोकरदन जि. जालना. सर्व मयत एकमेकांचे सख्खे नातेवाईक आहेत.
अवैध वाळू उपसा करण्याचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर
या घटनेमुळे अवैध वाळू उपस्याचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. रवींद्र आनंद या ठेकेदारकडून या पुलाचे काम सुरू आहे. ठेकेदाराने स्वस्त वाळू उपलब्ध व्हावी म्हणून रात्रीच्या वेळी अवैध वाळू उपसा करून टाकत आहे. ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळेच पाच जणांचा मृत्यू झाला, असा दावा ग्रामस्थांनी केला आहे. तसेच पंचनामा न करता शव ताब्यात घेऊ नये, असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला. त्यानंतर पोलीस पंचनामा करण्यात आला. अवैध वाळूचा विषय असल्याने महसूल पथकालाही पाचारण करण्यात आले, अशी माहिती पोलीस निरीक्षक इंगळे यांनी दिली.