भुसावळ -: दर्यापूर येथील ग्रामपंचायतींमध्ये १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून न झालेल्या कामाची मोजमाप पुस्तीका ( MB ) तयार करुन अपहार करण्याचा प्रयन्त दर्यापूर ग्रामपंचायतीचे महिला सरपंच सुशिला राजेश शेटे.ग्रामपंचायत अधिकारी राहुल चौधरी तसेच शाखा अभियंता डाकुर पं समिती भुसावळ यांनी केल्याचे उघड झाले असतांना देखील भुसावळ पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनी मात्र सदर प्रकरणाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे. सदर तक्रारीची सखोल चौकशी करुन दोषींवर कारवाईची मागणी उपसरपंच यांच्यासह ग्रामपंचायत सदस्यांनी केली आहे.
दर्यापूर ग्रामपंचायतीमध्ये १५ वा वित्त आयोगाच्या झालेल्या कामांची देयके अदा करणे तसेच वित्त आयोगाच्या कामांची चर्चा करण्यासाठी विशेष सभा बोलवली होती.
त्यामध्ये १५ व्या वित्त आयोगाच्या योजनेची मोजमाप पुस्तीका (एमबी) तपासली असता ते काम झालेले दिसून आले नाही. तर त्याची मोजमाप पुस्तिका भुसावळ पंचायत समितीचे अभियंता डाकुर यांनी पूर्ण बनवून त्यावर स्वाक्षरी केल्याचे दिसत आहे. ग्रामपंचायत हद्दीत जे काम ग्रामपंचायतीने किंवा कोणत्या ठेकेदाराने केलेलेच नाही, अशा कामाची मोजमाप पुस्तीका तयार झालीच कशी असा प्रश्न येथील ग्रामपंचायत सदस्यांना पडलेला आहे.
यामुळे सरपंच, ग्रामपंचायत अधिकारी तसेच अभियंता यांनी संगनमताने अपहार करण्याचा प्रयत्न केल्याचे आढळून आले आहे. बनावट व परस्पर पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीचा अपहार करण्यासाठी तयार केलेली मोजमाप पुस्तिका ग्रामपंचायत सदस्य प्रशांत किसन गवळी तसेच उपसरपंच मधुकर ज्योतीराम प्रधान यांच्या निर्दशनास आली. शासनाने या संदर्भात दिलेल्या तक्रारींची तात्काळ दखल घेवून दोषीविरुद्ध कारवाई करावी अशी तक्रार संबंधित ग्रामपंचायतचे उपसरपंच तसेच सदस्य यांनी केलेली असताना देखील भुसावळ पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनी मात्र संबंधित दोषींना पाठीशी घालण्याचा प्रयन्त करित आहे.
सदर प्रकरणाची चौकशी करुन दोषींनवर कारवाई न झाल्यास उपोषणाला बसणार असल्याचा इशारा ग्रामपंचायत सदस्य प्रशांत गवळी व उपसरपंच मधुकर प्रधान यांनी दिला आहे.