फक्त पन्नास रुपयांसाठी गमावली नोकरी; तीन वाहतूक पोलिसांचं निलंबन

0
47

पाचोरा तालुक्यात चाळीसगाव रस्त्यावर माल वाहतूक करणाऱ्या गाड्यांना रस्त्यात अडवण्याचे व पोलिसांकडून पैशांची मागणी करण्याचे प्रकार कायम सुरू असतात. काहीवेळी पोलीस अधिक पैशांसाठी अडून बसण्याचेही प्रकार घडतात.

सध्या सोशल मीडियावर जिल्ह्यातील पाचोरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत मालमोटार चालकाकडून वाहतूक पोलीस ५० रुपये मागत असल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

मात्र या 50 रुपयांसाठी पोलिस खात्याची नोकरी गमावण्याची वेळ आली आहे. जळगावमध्ये तीन वाहतूक पोलिसांचं निलंबन करण्यात आले आहे. त्यात सहायक फौजदाराचाही समावेश आहे. या पोलिसांचा संशयास्पद व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिस खात्याने त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला आहे.

दरम्यान, व्हिडीओत वाहतूक पोलीस ५०० रुपयांची मागणी करत असताना, चालक ५० रूपये घेण्याची विनंती करत होता. शेवटी पोलीस १०० रुपयांवर आला, तरीही मालमोटारीचा चालक आम्ही तुम्हाला नेहमीच पैसे देतो म्हणत ५० रुपये देण्यावर ठाम राहिला. त्यामुळे समोरचा वाहतूक पोलीस आमची ५० रुपयांइतकीच इज्जत आहे का, असा प्रश्न करुन चिडल्याचे दिसते. हा व्हिडिओ तीन ते चार महिन्यांपूर्वी तयार करण्यात आला आहे.

मात्र, ती शनिवारी समाजमाध्यमात समोर आली. यानंतर पैसे घेणारा भ्रष्ट पोलीस कर्मचारी कोण म्हणून चर्चा रंगली होती. त्यानंतर मालमोटारीच्या चालकाकडून ५० रुपये स्वीकारणारा पोलीस कर्मचारी पवन पाटील याच्यावर रविवारी तडकाफडकी निलंबनाची कारवाई पोलीस अधीक्षकांकडून करण्यात आली. पवनबरोबर इतर वाहनांवर कारवाई करताना व्हिडीओत दिसून आलेले सहायक फौजदार गुलाब मनोरे, हवालदार चेतन सोनवणे यांचेही निलंबन जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी सोमवारी केले.

दरम्यान, सहायक फौजदारासह अन्य दोन कर्मचारी तडकाफडकी निलंबित झाल्याच्या प्रकारानंतर पाचोरा तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.

Spread the love