गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर कार खरेदी करून स्वप्न पूर्ण केले. नवीन गाडी असल्याने मुलांना देखील मौज वाटत होती. मात्र कार घेतल्यानंतर दोन दिवसांनीच दुर्दैवी घटना घडली आणि गाडी घेतल्याच्या आनंदावर विरजण पडले.
गाडीने घराकडे येताना दुसऱ्या एका कारने मागून धडक दिली. यात सात वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चाळीसगाव शहरातील श्रीपतनगर परिसरातील रहिवासी दिनेश महाजन यांनी गुढीपाडव्याला कार खरेदी केली होती. या कारने धुळ्याकडून ते चाळीसगावकडे येण्यासाठी निघाले होते. यावेळी गाडीत दिनेश महाजन यांच्यासोबत त्यांच्या पत्नी स्वाती महाजन, मुलगी आरोही (वय १०) व मुलगा देवांश (वय ५) हे देखील होते. तर त्यांच्या गाडीच्या मागे एक कार देखील चाळीसगावच्या दिशेने येत होती.
धडक बसताच चिमुकला कारच्या बाहेर फेकला गेला
चाळीसगाव- धुळे रस्त्यावरील डेराबर्डी भागात दिनेश महाजन यांच्या गाडीला मागून भरधाव वेगाने येणाऱ्या डॉ. उत्तमराव महाजन यांच्या कारने जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरात होती, की कारमधील पाच वर्षीय देवांश हा थेट गाडीतून बाहेर फेकला गेला. यात त्याचा जागीच मृत्यू झाला व गाडी रस्त्याच्या विरुद्ध दिशेने झाली. या अपघातात दिनेश महाजन, स्वाती महाजन व आरोही महाजन हेही जखमी झाले आहेत.
आई- वडिलांचा आक्रोश
दरम्यान धडक देणारी गाडी डॉ. उत्तमराव महाजन चालवीत होते व ते एकटेच त्यांच्या गाडीत होते. या अपघाताची माहिती कळताच पोलिस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांनी ग्रामीण रुग्णालयात जाऊन पाहणी केली. या प्रकरणी शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर कार घेतल्याच्या दोन दिवसांनी अपघात घडून मुलाचा मृत्यू झाल्याने आई- वडिलांनी एकच आक्रोश केला.