वाढलेल्या गर्दीमुळे चेंगराचेंगरीसदृश परिस्थिती
नाशिक – : (JSN) सप्तशृंगी गडावर चैत्रोत्सवानिमित्त आईच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी झाली आहे. बुधवार रात्रीपासून वाढलेल्या गर्दीमुळे चेंगराचेंगरीसदृश परिस्थिती निर्माण झाली. यामुळे मंदिर प्रशासन, पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेची चांगलीच तारांबळ उडाली. नियोजनाचा अभाव आणि बॅरिकेड्स तुटल्याने लहान मुले, महिलांना मोठा त्रास सहन करावा लागला.
चैत्रोत्सव गुढीपाडव्यापासून सुरू झालेला हनुमान जयंतीपर्यंत चालणार आहे. राज्यभरातून भाविकांची संख्या वाढत असताना पहिल्या पायरीजवळ गर्दीचे नियोजन चुकले. बॅरिकेड्स लावून दर्शन मार्ग सुलभ करण्याचा प्रयत्न अपयशी ठरला. यामुळे भाविकांनी प्रशासन आणि पोलिसांवर नाराजी व्यक्त केली. “अंबे माता की जय”च्या घोषणांनी गड दुमदुमला, पण गर्दीमुळे भवानी चौकातील व्यापाऱ्यांचे व्यवहार ठप्प झाले.
प्रशासनाने गर्दी नियोजनासाठी बैठका घेतल्या, पण अंमलबजावणीअभावी सर्व प्रयत्न निष्फळ ठरले. दर्शनासाठी जाणाऱ्या आणि परत येणाऱ्या भाविकांसाठी स्वतंत्र रांगा आणि दुकानांसाठी वेगळे नियोजन अपेक्षित होते, मात्र ते झाले नाही. परिणामी, चेंगराचेंगरीची स्थिती उद्भवली. भाविकांचा उत्साह दिसला, पण प्रशासनाची तयारी कमी पडल्याने प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.