भुसावळ : – इथला बहुजन समाज हजारो वर्षां पासून मानसिक , धार्मिक गुलामगिरीत खितपत पडलेला आहे, तो आजही गुलामीतून बाहेर पडून माणुसकीचे, स्वाभिमानाचे जिणे जगण्याच्या तयारीत नाही . बहुजन महापुरुषांची बदनामी तो उघड्या डोळ्यांनी बघतो त्याला स्वाभिमानाने जगायचे असेल तर फुले आंबेडकरांची विचारधारा प्रत्यक्ष कृतीत आणणे आवश्यक आहे असे स्पष्ट प्रतिपादन प्रसिद्ध साहित्यिक जयसिंग वाघ यांनी केले. कंडारी ( भुसावळ) येथील गौतम हाउसिंग सोसायटी तर्फे ११ एप्रिल रोजी आयोजित कार्यक्रमात मुख्यावक्ता म्हणून भाषण करतांना वाघ बोलत होते.
जयसिंग वाघ यांनी आपल्या भाषणात पुढं सांगितले की, भारतात सोळाव्या शतकात शिवाजी महाराजांच्या व्यतिरिक्त असलेले सर्व राजे हे मोगलांचे मांडलिक होते . स्वराज्याची व स्वाभिमानाची भाषा फक्त शिवाजी महाराज करीत होते . त्यांचा कित्ता इतर राज्यांनी गीरविला असता तर मोगल भारतातून पळून गेले असते व इंग्रज येवू शकले नसते . महात्मा फुले यांनी शिवाजी महाराजांना आदर्श मानले , त्यांची समाधी शोधून काढली , शिव जयंती सुरू केली , शिवाजींवर पोवाडा रचला व समाज परिवर्तनाची लढाई लढली . पुढं बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले यांना आपला गुरू मानतात व सामाजिक , राजकीय , धार्मिक क्रांती करून देशाचे संविधान लिहितात हे सर्व बहुजनांनी समजून घ्यावे असेही प्रतिपादन जयसिंग वाघ यांनी केले .
रिपब्लिकन पक्षाचे नेते लक्ष्मण जाधव यांनी आपल्या भाषणात समाजातील अनिष्ट रूढी परंपरा यावर टीका करून जनतेने अंधश्रद्धा सोडून द्यावी व भगवान बुद्ध यांनी सांगितलेल्या तत्त्वांचा अंगीकार करावा असे आवाहन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बाबुराव बोराडे होते . मान्यवरांच्या हस्ते सुरवातीस छत्रपती शिवाजी महाराज , महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले . समितीचे अध्यक्ष सुरेश सोनवणे , मालुताई नरवाडे , डॉ. वंदना वाघचौरे , गणेश मोरे , आशाबाई हुसले , रवींद्र पाटील , सुरेश यशोदे , संदीप सिंगारे मंचावर हजर होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वप्निल सूर्यवंशी , प्रास्ताविक अमन घोडेस्वार , आभारप्रदर्शन सुभाष लोखंडे यांनी केले .
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राहुल घोडेस्वार , नंदू सोनवणे , दत्तात्रय इंगळे , गौतम साळुंके , धर्मेंद्र तायडे , विशाल खेळकर यांनी परिश्रम घेतले . कार्यक्रमास लोक मोठ्याप्रमाणात हजर होते.