हक्क मागून मिळत नसतो तर त्यासाठी संघर्ष करावा लागतो, असे सांगणारे मानवतावादी व क्रांतिकारी विचारांचे नेते भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती.

0
29

हक्क मागून मिळत नसतो तर त्यासाठी संघर्ष करावा लागतो, असे सांगणारे मानवतावादी व क्रांतिकारी विचारांचे नेते भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची आज दि. १४ एप्रिल जयंती.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे अर्थशास्त्रज्ञ म्हणून ओळखले जातात. त्यांचा मुख्य विषय अर्थशास्त्र होता. या विषयावर त्यांनी विपुल लेखन केले आहे. आदर्श चलन पद्धती, कृषी उद्योग, खासगी सावकार प्रतिबंधक विधेयक, जातीचे अर्थशास्त्र, आर्थिक पायाभरणी इत्यादी विषयावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी विचार मांडले आहेत. भारताची केंद्रिय बॅंक – भारतीय रिझर्व बॅंकेच्या स्थापनेत बाबासाहेबांचे मोठे योगदान आहे. भारत देशाच्या इतिहासातील पहिले सर्वश्रेष्ठ अर्थशास्त्रज्ञ हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर होत. देशाच्या सामाजिक-राजकीय क्षितिजावर त्यांचा उदय इ.स. १९२० च्या दशकात झाला. समाजाच्या, अस्पृश्य म्हणून हिणविल्या गेलेल्या अगदी तळातील वर्गाच्या पुनरुत्थानासाठी सामाजिक, राजकीय, आर्थिक आणि धार्मिक पातळीवर तेव्हापासूनच त्यांचा संघर्ष सुरू होता. बाबासाहेब एक थोर विचारवंत होते आणि त्यांनी अर्थशास्त्रज्ञ, समाजशास्त्रज्ञ, विधिज्ञ, शिक्षणतज्ज्ञ, पत्रकार, संसद सदस्य आणि या सर्वांच्या पलीकडे जाऊन समाजसुधारक आणि मानवाधिकारांचा रक्षक या नात्याने केलेले कार्य अतुलनीय आहे. देशभरातील अस्पृश्य समाजाला एकवटून, संघटित करून सामाजिक समतेच्या ध्येयाप्रत जाण्याच्या दृष्टीने राजकीय मार्ग कसा अवलंबायचा, याविषयी त्यांनी दिशादर्शन केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या एकदंर कार्यात सामाजिक सुधारणांना विशेषतः दलितोद्धाराच्या चळवळीला विशेष महत्त्व होते. ते स्वतः एका अस्पृश्य कुटुंबात जन्मल्याने त्यांना अस्पृश्यतेचे अनेक वाईट अनुभव आले होते. म्हणूनच त्यांनी अस्पृश्यता नष्ट करणे आणि अस्पृश्यांचा सर्वांगीण विकास करणे हे आपल्या जीवनाचे पहिले ध्येय ठेवले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा समाजसुधारणाविषयक दृष्टिकोण एकोणिसाव्या शतकातील नेमस्त सुधारकांपेक्षा गुणात्मकदुष्ट्या भिन्न होता. नेमस्त सुधारकांनी सुचविलेल्या सुधारणा विधवा विवाह, केशवपन, विवाहाची वयोमर्यादा इत्यादी कौटुंबिक सुधारणासंबंधी होत्या. नेमस्त सुधारकांचा हृदय परिवर्तनावर विश्वास होता. मात्र हृदय परिवर्तनाला मर्यादा असतात असे मत डॉ. आंबेडकरांचे होते.

बाबासाहेब आंबेडकरांची मूळ लढाई भारतातील जातिव्यवस्थेविरुद्ध होती. जात ही माणसासाठी, समाजासाठी आणि राष्ट्रासाठी विनाशकारी मानसिकता आहे, अशी त्यांची धारणा होती. त्यांना जातिव्यवस्थेबद्दल प्रचंड घृणा होती. एका जातीचा समूह दुसऱ्या जातीच्या समूहाला गुलामासारखी वागणूक देतो, ती व्यवस्था नेस्तनाबूत करणे हे त्यांचे ध्येय होते. त्यासाठी त्यांनी सर्वप्रथम इतिहासाचे उत्खनन सुरू केले. भारतात जाती नेमक्या कशा जन्माला आल्या, त्या हजारो वर्षे का टिकल्या, त्यांना कुणी पोसले आणि ती भारतीय समाजाच्या रक्तात इतकी कशी मुरली, मेंदूत कशी भिनली, याचा त्यांनी शोध घेतला. अफाट अभ्यास, चिंतन, मनन आणि तर्काच्या आधारावर भारतीय इतिहासाची त्यांनी नव्याने मांडणी केली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून त्यांचा गौरव करतो, त्याहीपेक्षा भारतात सामाजिक परिवर्तनाचा सैद्धांतिक लढा त्यांनी उभा केला, त्याबद्दल त्यांच्याप्रति आदर व्यक्त केला जातो. प्राचीन भारतातील क्रांती आणि प्रतिक्रांती याचा शोध घेत त्यांनी प्रचलित इतिहासाला धक्का देणारा नवा इतिहास रेखाटला. भारताचा इतिहास हा बहुतांश मुस्लीम आक्रमणावर, त्यांच्या जुलमी राजवटीवर अधिक केंद्रित झाला आहे. बाबासाहेबांना हा इतिहास फारच वरवरचा वाटतो आणि तो तसा खराही नाही, असे त्यांचे मत होते. मौर्य व गुप्त या दोन राजघराण्यांच्या संघर्षांत भारतीय इतिहासाची मुळे ते शोधतात.

भारतात समता, स्वातंत्र्य, बंधुभावाचा विचार देणाऱ्या बौद्ध धर्माचा उदय ही क्रांती होती आणि बौद्ध धर्माचा पाडाव व चातुर्वण्र्य व्यवस्थेचा जन्म ही प्रतिक्रांती होती, अशी त्यांनी मांडणी केली. या प्रतिक्रांतीचा नायक कोण, त्यांनी कोणकोणती शस्त्रे व शास्त्रे वापरली, याची अभ्यासपूर्ण आणि तर्कशुद्ध चिकित्सा त्यांनी केली आहे. त्यावर आधारित त्यांनी काही अनुमान काढले, काही भाष्य केले. मुसलमानांनी हिंदू भारतावर आक्रमण केले हे खरे, परंतु त्याआधी इसवी सनपूर्व १८५ च्या दरम्यान मौर्य घराण्यातील बौद्ध राजाचा पुष्यमित्राने केलेला खून आणि बळकावलेले राज्य ही प्रतिक्रांती होती. या प्रतिक्रांतीने भारतीय समाजाची उभी-आडवी विभागणी करणारी चातुर्वण्र्य व्यवस्था जन्माला घातली, त्याविरोधात आंबेडकरांचा लढा होता. बौद्ध धर्माचा पाडाव करण्यासाठी शस्त्राबरोबर शास्त्रांचा आधार घेतला गेला, असे त्यांना वाटत होते.

त्यांचा कोणत्याही धर्माला विरोध नव्हता तर, माणसाचे माणूसपणच हिरावून घेणारी, समाज आणि देश दुबळा करणारी जातिव्यवस्था ही डॉ. आंबेडकरांच्या चिंतेचा, चिंतनाचा व लढय़ाचा विषय होता. ते केवळ इतिहासाचे उत्खनन करून थांबले नाहीत, तर पुढे त्यांनी चातुर्वण्र्य व्यवस्था व जातिव्यवस्थेच्या समूळ उच्चाटनाचीही मांडणी केली. राजकीय स्वातंत्र्य आधी की सामाजिक सुधारणा हा टिळक व आगरकर यांच्यातील वाद डॉ. आंबेडकरांच्याही मनात चालत होता. स्वातंत्र्योत्तर भारतात तत्कालीन अस्पृश्यांच्या स्वातंत्र्याला काहीच किंमत नसेल, तर त्यातून अधिक गुंतागुंतीच्या समस्या निर्माण होतील. तसे होऊ नये यासाठी त्यांनी अस्पृश्यता निवारणाचे कार्य हाती घेतले. ‘जातिप्रथेचे विध्वंसन’ या नावाने त्यांनी जातिअंताचा जाहीरनामा मांडला. तेवढय़ावर ते थांबले नाहीत, त्यांनी जातिव्यवस्थेचा आधार असलेला हिंदू धर्मच नाकारला. त्यांनी १४ ऑक्टोबर १९५६ ला बौद्ध धम्माचा स्वीकार केला. त्याला धम्मक्रांती म्हटले जाते.

पंडीत नेहरुंचे स्वीय सहाय्यक एम.ओ.मथाई एकदा बाबासाहेबांना भेटावयास आले, त्यावेळेस गप्पांच्या ओघात त्यांनी मथाई यांना सांगितले की, “अलिकडच्या शतकात भारताने निर्माण केलेला सर्वात मोठा माणूस म्हणजे स्वामी विवेकानंद आहेत, गांधी नव्हे.” कारण स्वामी विवेकानंदांनी हे विश्वचि माझे घर ही संकल्पना हिंदूराष्ट्रातर्फे मांडली तर महात्मा गांधींनी मात्र जातिव्यवस्था संपूर्णतः मोडीत काढण्याचे फारसे प्रयत्न केलेच नाहीत. कायदामंत्री या नात्याने डॉ. आंबेडकर यांनी हिंदू कोड बिल संमत करण्यासाठी मोठा संघर्ष केला. महिलांचे अधिकार, विशेषतः विवाह आणि पितृसंपत्तीविषयक अधिकार सुरक्षित करणारी ही मोठी सामाजिक सुधारणा होती. हे विधेयक संसदेत संमत होऊ शकले नाही, म्हणून सप्टेंबर इ.स.१९५१ मध्ये त्यांनी राजीनामा दिला.

डॉ. आंबेडकर यांचे व्यक्‍तिमत्त्व अनेक पैलूंनी युक्‍त असले तरी त्यात एक समान धागा होता आणि तो आर्थिक हित पाहणारा होता. ‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ या त्यांनी दिलेल्या मंत्रातूनच त्यांचे आर्थिक विचार सुस्पष्टपणे दिसून येतात. आंबेडकरांचे विचार सामाजिक, धार्मिक आणि नैतिक तत्त्वांवर आधारलेले असून, शोषक आणि शोषित हा त्यांच्या विचारांचा केंद्रबिंदू होता. दबलेल्यांना उभारी देणे आणि शोषितांची जोखडातून मुक्‍तता करणे हाच त्यांच्या विचारांचा मूलाधार आहे. सर्वांना स्वातंत्र्य, समता आणि न्याय मिळावा, हाच त्यांच्या वैचारिक मांडणीचा प्रमुख हेतू होता.

शाळा म्हणजे उत्तम नागरिक व कर्तव्यदक्ष नागरिक बनविणारे कारखाने आहेत, हा विचार मांडणाऱ्या या महामानवाने ६ डिसेंबर १९५६ ला या जगाचा निरोप घेतला. आज जयंतीदिनी त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन!

Spread the love