महायुतीसाठी गेमचेंजर ठरलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत लाभार्थी महिलांना दरमहा १५०० रुपये मिळतात. मात्र, ज्या महिला शेतकरी सन्मान योजनेचा लाभ घेत आहेत, अशा ८ लाख महिलांना दरमहा फक्त ५०० रुपये दिले जातील, असा दावा करीत काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर टीकास्त्र डागले.
वडेट्टीवार यांनी लाडकी बहीण योजनेंतर्गत महिलांना दरमहा मिळणाऱ्या १५०० रुपयांत घर चालते का? असा प्रश्न उपस्थित केला. कुटुंबात आधार नाही, अशा महिलांना सरकार १५०० रुपये देत होते, त्यांना फायदा झाला असता. आता लाडक्या बहिणींना १५०० रुपयांऐवजी फक्त ५०० रुपयेच दिले जाणार आहेत. सरकारच्या या निर्णयाची कीव करावीशी वाटते.
हे फार दुर्दैवी आहे. सरकारने मतासाठी त्यावेळस सरसकट महिलांना लाभ दिला आणि मतं घेतली. मात्र, आता ही योजना गुंडाळण्यासाठी आणि सरकारी तिजोरीवरील ताण कमी करण्यासाठी अशा प्रकारच्या युक्ती वापरणे निंदनीय असल्याचे वडेट्टीवार म्हणाले.