जळगाव आरटीओ लिपिकाची खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी

0
33

जळगाव ;- जळगाव प्रादेशिक परिवहन कार्यालयातील (आरटीओ) वरिष्ठ लिपिकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार केल्याच्या रागातून आरटीओ प्रतिनिधी सुलतानबेग नजीरबेग मिर्झा (वय ५३, रा.एबी कॉलनी, उस्मानिया पार्क) यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिली. ही घटना ११ एप्रिल रोजी आरटीओ कार्यालयाच्या आवारात घडली. याप्रकरणी रामानंद नगर पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

सुलतानबेग नजीरबेग मिर्झा हे उस्मानिया पार्कमधील एबी कॉलनीत राहतात आणि आरटीओ एजंट म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी यापूर्वी आरटीओ कार्यालयातील वरिष्ठ लिपिक चंद्रशेखर शिकरराव इंगळे यांच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. या तक्रारीचा राग मनात धरून चंद्रशेखर इंगळे यांनी ११ एप्रिल रोजी आरटीओ कार्यालयाच्या आवारात सुलतानबेग यांना शिवीगाळ केली आणि “तुला खोट्या गुन्ह्यात अडकवून टाकेन” अशी धमकी दिली.

सुलतानबेग मिर्झा यांनी या घटनेची तक्रार रामानंद नगर पोलिस ठाण्यात नोंदवली. तक्रारीच्या आधारे चंद्रशेखर इंगळे यांच्याविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल जितेंद्र राजपूत करत आहेत.

Spread the love