तळोदा | दिनांक: 20 एप्रिल (JSN )सेवाभावे प्रतिष्ठान, तळोदा यांच्या वतीने समाजहिताच्या दृष्टिकोनातून एक महत्त्वपूर्ण उपक्रम हाती घेत, स्व. भारतसा खुशालसा सोनवणे यांच्या पवित्र स्मृतीप्रित्यर्थ शहरात पाणपोई उभारण्यात आली असून, दिनांक 20 एप्रिल 2025 रोजी या पाणपोईचे उद्घाटन अत्यंत मंगलमय वातावरणात पार पडले.
या उद्घाटन सोहळ्याचे प्रमुख उद्घाटक म्हणून विमलगिरी हॉस्पिटलचे संचालक डॉ. सारंगजी सुधीरकुमार माळी उपस्थित होते. त्यांनी आपल्या उपक्रमाचे मनापासून कौतुक करताना सांगितले की, “उन्हाळ्याच्या या तिव्रतेत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे म्हणजे खरोखरच एक सेवाभावी कार्य आहे. अशा कार्यातून समाजात माणुसकी जपली जाते.”
उद्घाटन प्रसंगी विशेष अतिथी म्हणून ब्रह्मकुमारी ओम शांती तळोदा प्रमुख दीदी जी उपस्थित होत्या. दीदीजींनी भगवद्गीतेतील प्रेरणादायी श्लोक पठण करून कार्यक्रमाची सुरुवात केली. त्यांनी आपल्या आशीर्वचनपर भाषणात आध्यात्मिक दृष्टिकोनातून सेवा म्हणजेच परमार्थ याचे मोल विशद केले.
कार्यक्रमास सीनियर कॉलेजचे निवृत्त प्राध्यापक आणि माळी समाज पंच श्री. राजाराम राणे सर, विश्व हिंदू परिषदेचे देवगिरी प्रांताचे विशेष संपर्क सहप्रमुख श्री. विजयराव सोनवणे, गजानन कृषी अॅग्रोचे संचालक श्री. सुभाष चौधरी, तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते.
सेवाभावे प्रतिष्ठानचे अध्यक्ष चि. उमेश भैय्या विजयसा सोनवणे यांनी आपल्या भाषणात या उपक्रमामागील भावना व्यक्त करताना सांगितले, “स्व. काकाच्या स्मृती जपण्यासाठी आणि समाजाला उपयुक्त अशी सेवा घडावी या हेतूने ही पाणपोई उभारली आहे. हे फक्त पाण्याचे ठिकाण नसून, हे एक समाजसेवेचे प्रतीक आहे.”
या वेळी डॉ.शांतीलाल पिंपरे, श्री.राजेश चौधरी, श्री.भरत कलाल, श्री.सतीश गुरव, श्री.शिरीष मगरे, श्री.निलेश पाटील, श्री.मुकेश जैन, श्री.सौरभ माळी, श्री.अमित कलाल यांच्यासह अनेक मान्यवर आणि गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात भारतमातेच्या पूजनाने करण्यात आली, ज्याने देशभक्ती आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश दिला. कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन सेवाभावे प्रतिष्ठानचे अध्यक्ष चि.उमेश भैय्या विजयसा सोनवणे, उपाध्यक्ष श्री.सागर पाटील, सचिव श्रीमती.कविता बाई कलाल, कार्याध्यक्ष श्री.संतोष चौधरी, तसेच संचालक मंडळातील श्री.अतुल पाटील, श्री.नकुल ठाकरे, श्री.अनिल नाईक यांनी केले.