पाकची पोकळ धमकी ! “युद्धाचे ठिकाण तुम्ही ठरवा पण ते कुठे संपवावे ते आम्ही ठरवु”

0
29

जम्मू काश्मीर मधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संबंधांमध्ये बराच तणाव निर्माण झाला आहे. भारताने पाकिस्तानविरुद्ध अनेक कठोर पावले उचलली आहेत. दरम्यान, पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ते लेफ्टनंट जनरल अहमद शरीफ चौधरी यांनी भारताला थेट इशारा दिला आहे. पाकिस्तानचे लष्करी प्रवक्ते लेफ्टनंट जनरल अहमद शरीफ चौधरी यांनी भारताला इशारा दिला की, “जर भारताने कोणताही हल्ला केला तर त्याला कडक आणि विचारपूर्वक उत्तर दिले जाईल.” तसेच ते पुढे म्हणाले, “हल्ल्याचे ठिकाण भारत ठरवेल, पण ते कुठे संपेल ते आम्ही ठरवू.” अहमद शरीफ चौधरी यांनी इस्लामाबादमध्ये उपपंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री इशाक दार यांच्यासोबत संयुक्त पत्रकार परिषदेत हे विधान केले.

इंटर-सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्स (ISPR) चे प्रमुख लेफ्टनंट जनरल चौधरी म्हणाले की, पाकिस्तानचे सैन्य, नौदल आणि हवाई दल जमीन, हवाई आणि समुद्र या तिन्ही आघाड्यांवर प्रत्युत्तर देण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहेत. ते म्हणाले की, पाकिस्तानने पूर्व आणि पश्चिम दोन्ही सीमेवर देखरेख वाढवली आहे. ते म्हणाले, “पाकिस्तानच्या सार्वभौमत्वाचे आणि सुरक्षेचे रक्षण करण्यासाठी आम्ही कोणत्याही थराला जाऊ. सर्व प्रत्युत्तरात्मक उपाययोजना सज्ज आहेत. आमचे सैन्य पूर्णपणे सतर्क आणि सतर्क आहे.”

पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ते लेफ्टनंट जनरल अहमद शरीफ चौधरी यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत भारताने केलेले आरोप फेटाळून लावले आहेत. त्यांनी प्रश्न उपस्थित केला की, “भारताने काही मिनिटांतच पाकिस्तानचा या हल्ल्यामागे हात आहे हे कसे ठरवले.” तसेच “ज्या ठिकाणी हल्ला झाला ते नियंत्रण रेषेपासून (एलओसी) सुमारे २३० किलोमीटर अंतरावर आहे. इतक्या कठीण मार्गाने कोणीही १० मिनिटांत तिथे कसे पोहोचू शकते?” असा सवाल देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला.

लेफ्टनंट जनरल चौधरी यांनी आरोप केला की,”भारत सरकार निवडणुकीपूर्वी मुस्लिमविरोधी वातावरण निर्माण करण्यासाठी दहशतवादाशी संबंधित घटनांचा वापर करत आहे. “ते म्हणाले, “हे काही नवीन नाही. भारत प्रथम पाकिस्तानवर आरोप करतो, नंतर राजकीय कथा तयार करतो आणि निवडणुका जिंकण्यासाठी त्याचा वापर करतो.” असा गंभीर आरोप त्यांनी केला. भारतीय तुरुंगात बंद असलेल्या पाकिस्तानी कैद्यांना बनावट चकमकीत मारले जात असल्याचा दावाही त्यांनी केला. उदाहरण देताना, “मुहम्मद फारूक हा एक निष्पाप पाकिस्तानी नागरिक असताना त्याला घुसखोर म्हणत उरीमध्ये मारण्यात आले.” असे त्यांनी म्हटले.

Spread the love