जळगाव – : शहरातील हॉटेल कमल पॅराडाइजजवळ शनिवारी रात्री एका ३० वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली. मयत तरुणाचे नाव आकाश पंडीत भावसार असून, तो अशोक नगर परिसरात राहत होता. या घटनेने शहरात खळबळ उडाली असून, पोलिसांनी चार संशयितांचा शोध सुरू केला आहे.
प्राप्त माहितीनुसार, आकाश भावसार हा खासगी कंपनीत नोकरी करत होता. शनिवारी रात्री ११ च्या सुमारास हॉटेल ए वनजवळ त्याची पत्नीच्या नातेवाईकांशी भेट झाली. यावेळी काही तरुणांनी त्याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात त्याच्या छातीवर, मांडीवर आणि गुप्तांगावर गंभीर जखमा झाल्या. रक्तबंबाळ अवस्थेत त्याला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच जिल्हा रुग्णालयात मयताचे नातेवाईक आणि मित्रांनी मोठी गर्दी केली. आकाश यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण आहे.
पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक बबन आव्हाड आणि शनिपेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक रंगनाथ धारबळे यांनी रुग्णालयात भेट देऊन माहिती घेतली. पोलिसांना चार संशयितांची नावे मिळाली असून, त्यांचा शोध घेण्यासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत.