मुंबई : शहर आणि उपनगरात शनिवारी (ता. 24 मे) रात्रीपासून मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. शनिवारी रात्रीपासून सुरू झालेल्या पावसाची रविवारी (ता. 25 मे) सकाळी सुद्धा संततधार सुरू असल्याचेच पाहायला मिळत आहे.
पण आता संपूर्ण राज्यासाठीची आनंदवार्ता हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. कारण आठवड्याभराआधीच मान्सून केरळात दाखल झाला आहे. त्यामुळे पुढील दोन दिवसांत किंवा आठवड्याभरात महाराष्ट्रातही मान्सून हजेरी लावणार आहे. आठ दिवस आधीच मान्सूनने केरळमध्ये दाखल झाला असल्याची घोषणा हवामान विभागाकडून करण्यात आली आहे. केरळ, तामिळनाडू आणि कर्नाटकला मान्सूनने घेरले असून आज रविवारी तिन्ही भागात पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज रविवारी कोकण गोव्यातील बहुतांश ठिकाणांसह, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात बऱ्याच ठिकाणी पूर्वमोसमी पावसाची शक्यता आहे. यात रायगड, पुणे, कोल्हापूर, नांदेड, लातूर चंद्रपूर आणि नागपूर भागात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता ही हवामान विभागाकडून वर्तवली आहे. त्यामुळे या सात जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला असल्याचेही समोर आले आहे. तर, मुंबई शहर आणि उपनगरासह ठाण्यात पावसाच्या सरी कोसळत आहे. मुंबईत आज पहाटेपासून आकाशात काळ्या ढगांनी गर्दी केली आहे. दक्षिण मुंबई आणि उपनगर परिसरात सध्या पावसाच्या जोरदार सरी बरसत आहेत. ठाण्यातही पाऊस सुरू झाला आहे.