एक परखड व्यक्तिमत्व – जयसिंग वाघ 

0
19

आंबेडकरी चळवळीत साधारणतः १९८२ पासून क्रियाशील असलेले जयसिंग वाघ आज ६५ वर्षे पूर्ण करीत आहेत . चळवळीत ४२ वर्षे सक्रिय असून त्यांनी आपली स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. या ४२ वर्षात त्यांनी कधीही विचारांची तडजोड केली नाही . राजकीय चळवळी पासून, प्रस्थापित नेत्यांपासून त्यांनी स्वतःला दूर ठेवले. अत्यंत निस्पृह पणे त्यांनी कार्य केले आहे. विविध प्रश्नांवर त्यांनी मोर्चे, धरणे, रास्तारोको, घेराव सारखी आंदोलने करून त्या प्रश्नांना वाचा फोडली आहे. प्रश्नांची मांडणी करतांना त्यांनी अभ्यासपूर्ण मांडणी करून मंत्री, मंत्रालयातील सचिव, जिल्हाधिकारी यांना प्रसंगी निरुत्तर केले आहे.

सन १९८७ मध्ये जळगाव जिल्ह्यात मोठ्याप्रमाणात दंगली झाल्या असता त्यांनी प्रशिक विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून ११ दंगलग्रस्त गावांना भेटी देऊन त्या संबंधीचा अहवाल तयार केला. तत्कालीन गृहराज्यमंत्री यांच्या समवेत आव्हाणे येथे त्यांनी गावाची पाहणी केली असता विविध सामाजिक प्रश्न त्यांच्या समोर मांडले. ग्राम पंचायत मध्ये घेतलेल्या बैठकीत त्यांनी अत्यंत परखडपणे सामाजिक बाजू मांडली. १९९० मध्ये जिल्हा परिषदेतील अन्यायग्रस्त उमेदवारांच्या प्रश्नावर त्यांनी थेट मंत्रालयात बाजू मांडून त्या सर्व उमेदवारांना न्याय मिळवून दिला. या प्रश्नी मंत्रीमहोदय यांचे सोबत बैठक सुरू असताना जिल्हाधिकारी यांनी सी. ई. ओ. यांच्या चुकीमुळे हा प्रश्न निर्माण झाला आहे असे मत मांडले असता त्या सी. ई. ओ. साहेबांना शिक्षा द्या मात्र या उमेदवारांना न्याय द्या असे परखड मत त्यांनी मांडून मंत्री व जिल्हाधिकारी यांना निरुत्तर केले. जनगणना कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर वेळोवेळी आवाज उढवून त्यांनी शासनाचे लक्ष वेधले, तत्कालीन समाजकल्याण मंत्री यांना दोनवेळा घेराव घालून याही उमेदवारांना न्याय मिळवून दिला . विविध महाविद्यालयातील अनुशेष प्रश्नी त्यांनी संस्थाचालकांना जाब विचारून आंदोलन केले. त्यांच्या अभ्यासपूर्ण व परखड शैली मुळे ते विद्यार्थी दशेत बरेच नावारुपास आले होते. विद्यार्थी जीवनात विविध विषयावर त्यांनी विद्यार्थ्यांना बोलते केले. भारतीय संस्कृती , फुले आंबेडकर वाद या मुख्य विषयावर ते सातत्याने बोलत राहिले.

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठास धनाजी नाना चौधरी यांचे नाव देण्यात यावे अशी त्यांनी मागणी करून विविध प्रकारचे आंदोलन केले , परिषदा घेतल्या या प्रश्नी एका परिषदेत मधुकरराव चौधरी यांनी विरोध दर्शविला असता त्यांनी त्यांचे भाषण चालू असतानाच प्रतिप्रश्न विचारून त्यांना निरुत्तर केले . पुढं या प्रश्नी पाहिजे तो प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी बहिणाबाई चौधरी यांचे नाव उचलून धरले . विविध साहित्य संमेलनामध्ये त्या आशयाचा ठराव त्यांनीच मांडला . मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती व इतर प्रश्नांवर त्यांनी वेळोवेळी आंदोलन करून न्याय मिळवून दिला . बढती मधील आरक्षण प्रश्नी त्यांनी जळगाव जिल्ह्यातील ४२ मागासवर्गीय कर्मचारी संघटना एकत्र आणल्या . व मोठे आंदोलन उभारले .

संविधानाच्या पुनर्विलोकना करिता केंद्र सरकारने समिती नेमली असता संविधानाच्या पुनर्विलोकनाची आवश्यकताच काय ? असा रोखठोक सवाल करून त्यांनी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले . स्वतःची भाषणे केली. केंद्र सरकारने मांडलेले सर्व मुद्ये कसे चुकीचे आहे हे त्यांनी विविध पुराव्यानी सिद्ध केले . अगदी अलीकड महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे या करिता त्यांनी थेट बिहार राज्यातील गया व बुद्ध गया येथे त्यांच्या १६ सहकारी आंदोलकां सोबत आंदोलन केले . गयाच्या अतिरिक्त जिल्हाधिकारी यांचे सोबत या प्रश्नी चर्चा करत असताना त्यांनी अनेक ऐतिहासिक दाखले देऊन त्यांची मतं खोडून काढली  अनेक राष्ट्रीय , आंतरराष्ट्रीय विषयांवर सुध्दा ते अतिशय प्रखरतेने बोलत आलेले आहेत . त्यांच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा .

लेखक …….. प्रा. डॉ. पी. डी. जगताप २५० शिवाजी नगर , जळगाव संपर्क ……….९४२३९७३४१४

Spread the love