अर्थखात्यात घोटाळा, अजित पवार राजीनामा द्या; राऊतांनी आरोप करत केली मागणी

0
29

महायुती सरकारच्या महत्त्वाच्या योजनांपैकी एक असलेल्या लाडकी बहीण योजनेबाबत अनेक महत्त्वाची माहिती आता समोर येऊ लागली आहे. लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र असलेल्या अनेक महिलांनी सुद्धा या योजनेचा लाभ आता हळूहळू समोर येऊ लागला आहेत.

तर या योजनेत अनेक त्रुटी झाल्या असल्याची कबुली आता स्वतः उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडून देण्यात आली आहे. त्यामुळे याच मुद्द्यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी अजित पवारांवर निशाणा साधला आहे. अर्थखात्यात घोटाळा झाला आहे, त्यामुळे त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी राऊतांनी केली आहे.

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी नाशिक येथून प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना अर्थमंत्री अजित पवार यांनी लाडकी बहीण योजनेत झालेल्या त्रुटी मान्य केल्याबाबत विचारणा करण्यात आली. याबाबत उत्तर देताना खासदार राऊतांनी म्हटले की, लाडकी बहीण योजनेचा घोटाळा हा अर्थखात्यातून झाला आहे, त्यामुळे त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे. या योजनेसाठी पैसे कोणी दिले? या राज्याचे पैसे लुटले कोणी? या राज्याचे पैसे या नेत्यांनी लुटू दिले आहेत. लाडक्या बहिणींनी नाही तर लाडक्या भावांनी नावं बदलून महिलांची नावे ठेवली आणि या योजनेचा लाभ घेतला आहे. यामुळे शेकडो कोटी रुपयांचा लाभ हा सरकारी कर्मचाऱ्यांना झाला आहे. कारण त्यांनी हा लाभ घेतला आहे, असा आरोप राऊतांनी केला आहे.

या सरकारने हा लाभ अनेकांना घेऊ दिला. यांनी कोणतीही छानणी केली नाही. यांना हे जे काही घडत आहे, ते सर्व माहीत होते. पण त्यांना मते पाहिजे होते, म्हणून यांनी छानणी केली नाही. अर्थखात्याच्या माध्यमातून ही संपूर्ण लूट झाली, त्याचे प्रायश्चित कोणी केले पाहिजे? त्यामुळे त्याचे प्रायश्चित घेऊन तुम्ही राजीनामा द्या. या राज्याचे पैसे तुम्ही लूट दिले. त्यामुळे तुम्ही राजीनामाच दिला पाहिजे, अशी मागणीच शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे. त्यामुळे आता राऊतांच्या या आरोपांवर आणि या राजीनाम्याच्या मागणीवर अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून नेमके काय उत्तर देण्यात येते, हे पाहणे महत्त्वाते ठरणार आहे.

 

Spread the love