नांदगाव तालुक्यातील सावरगावमध्ये एक भयावह घटना घडली. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन एका व्यक्तीने आपल्या 40 वर्षांच्या पत्नीची हत्या केली. एवढ्यावरच न थांबता पतीने स्वत:लाही झाडाला गळफास घेत संपवलं.
विजय चव्हाण याने आपली पत्नी वर्षा (वय 40) यांचा दोरीने गळा आवळून खून केला. नंतर स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना सोमवारी (2 मे) सकाळी घडली. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात मृत विजय चव्हाण याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विजय चव्हाण हा सावरगाव येथील शेतात पत्नी वर्षा, मुलं आणि आई-वडिलांसोबत राहत होता. दोन वर्षांपूर्वी झालेल्या अपघातामुळे त्याची मानसिक स्थिती बिघडली होती. यामुळे पती-पत्नीमध्ये नेहमी वाद होत असत. विजयला पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता.
सोमवारी सकाळी विजयने आपला मोठा भाऊ अशोक चव्हाण याला फोन करून सांगितलं की, त्याने पत्नीचा खून केला असून, तो स्वतःच्या जीवाचंही बरं वाईट करणार आहे. अशोक आणि त्याच्या पत्नीने शेतात धाव घेतली असता, विजय शेताच्या बांधावर आंब्याच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला, तर वर्षा मृत अवस्थेत गोठ्यात पडली होती.