पावसाळ्यामुळे निर्माण होणाऱ्या अडचणी लक्षात घेता महाराष्ट्र सरकारने रेशन कार्डधारकांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. जून महिन्यातच तीन महिन्यांचे रेशन – म्हणजेच ऑगस्टपर्यंतचा शिधा – लोकांना पुरवण्यात येणार आहे.
हा उपक्रम राज्यात प्रथमच राबवण्यात येत असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली ही योजना सुरू करण्यात आली आहे.
पावसामुळे शिधा पोहोचण्यात अडचणी निर्माण होतात, म्हणूनच राज्य सरकारने नागरिकांना जून महिन्यातच संपूर्ण शिधा वाटप करण्याचे आदेश दिले आहेत. अनेक ठिकाणी शिधा दुकानांवर मोठ्या रांगा आणि गर्दी पाहायला मिळत आहे.
30 जूनपर्यंत वितरण पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले असून, राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतील लाभार्थ्यांना वेळेत धान्य मिळावे, यासाठी शासनाकडून यंत्रणा कार्यरत झाली आहे. दूरदराजच्या भागांतून आलेले नागरिक या योजनेचा लाभ घेत आहेत, त्यामुळे नागरिकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे.
लोकांनी सरकारच्या उपक्रमाचं भरभरून स्वागत केलं आहे, कारण पहिल्यांदाच एका वेळी तीन महिन्यांचं रेशन मिळत असल्याने पावसाळ्याच्या संकटातही अन्नधान्याची चिंता नाहीशी झाली आहे.