मुंबई -: गेल्या आठवड्यात मुंबईतल्या वरळी येथील डोम सभागृहात ठाकरे बंधू एकमेकांना मिठी मारताना दिसून आले. जवळपास २० वर्षांनंतर उद्धव ठाकरे व त्यांचे चुलत बंधू राज ठाकरे हे एकाच मंचावर आले होते.
महायुती सरकारने राज्यातील त्रिभाषा सूत्राचा निर्णय रद्द केल्यानंतर मनसे व शिवसेना ठाकरे गटाकडून विजयी सभा घेण्यात आली. दरम्यान, ठाकरे बंधूंच्या या ऐतिहासिक भेटीमुळे राज्यातील राजकारणाला वेगळं वळण मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्या संदर्भात ‘द इंडियन एक्स्प्रेस’च्या सहयोगी संपादक नीरजा चौधरी यांनी एक लेख लिहिलाय. त्यांनी नेमकं काय म्हटलंय? ते जाणून घेऊ…
नीरजा चौधरी लिहितात, उद्धव ठाकरे यांनी आपल्या हेतूबाबत कोणतीही गुंतागूंत ठेवली नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनेनंतर मुंबई महापालिकेसह राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच होणार आहेत. या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंनी देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिकेवर सत्ता मिळवण्याबाबत ठाम संकेत दिले आहेत. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या विजयी मेळाव्यातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उपरोधिक टोला लगावला. “शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंना जे जमलं नाही, ते फडणवीसांनी करून दाखवले”, असं ते म्हणाले. तर उद्धव ठाकरे हेदेखील भाजपावर टीका करताना दिसून आले आणि त्यांनी भरसभेत राज यांच्याबरोबर युती करण्याचे संकेत दिले.
मनसेला निवडणुकीत का मिळत नाहीये यश?
- राज ठाकरे हे एक प्रभावी वक्ते व मजबूत संघटनात्मक क्षमतेसाठी ओळखले जातात.
- सुरुवातीला त्यांना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे उत्तराधिकारीही मानलं जात होतं.
- मात्र, २००५ मध्ये बाळासाहेबांनी उद्धव ठाकरे यांना शिवसेनेत मोठी जबाबदारी दिली.
- त्यानंतर राज हे नाराज होऊन पक्षातून बाहेर पडले आणि २००६ मध्ये त्यांनी मनसेची स्थापना केली.
- आजही राज ठाकरे यांच्या सभेला अलोट गर्दी होते; पण त्या गर्दीचे रुपांतर मतांमध्ये होताना दिसून येत नाही.
- याच कारणामुळे मनसेला कोणत्याही निवडणुकीत अपेक्षित यश मिळवता आलेलं नाही.
- गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत पक्षाला केवळ एक टक्क्याच्या आसपास मते मिळाली.