जळगाव – जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यात एका धक्कादायक फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला आहे. निनाद विनय कापुरे नावाच्या एका तरुणाने स्वतःला तहसीलदार भासवून अनेक महिलांची लाखो रुपयांची फसवणूक केली आहे.
आरोपी निनाद कापुरे हा मेट्रोमोनिअल साईट्सवर ‘प्रीमियम अकाउंट’ वर स्वतःची खोटी प्रोफाइल तयार करत असे. या प्रोफाइलमध्ये तो स्वतःला तहसीलदार असल्याचे भासवत असे. प्रामुख्याने तो विधवा, घटस्फोटीत आणि उच्चशिक्षित महिलांना लक्ष्य करत असे. तहसीलदार असल्याची खोटी प्रोफाइल टाकून विवाहासाठी हाय प्रोफाईल महिलांशी संपर्क करायचा.
लग्नाचे आमिष दाखवून आणि विश्वास संपादन करून तो त्यांच्याकडून लाखो रुपये उकळत असे. एवढेच नाही, तर तहसीलदार असल्याने नोकरी लावून देण्याच्या बहाण्यानेही त्याने अनेकांची आर्थिक फसवणूक केली आहे. राज्यभरातील किमान सात ते आठ महिला या फसवणुकीला बळी पडल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी जळगाव पोलिसांकडे गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.
राज्यात अनेक ठिकाणी गुन्हे दाखल
निनाद कापुरेने एका महिलेला लग्नाच्या नावाखाली सात लाख रुपयांना गंडा घातला, तर दुसऱ्या महिलेच्या मुलीला लग्नासह पुण्याच्या ससून रुग्णालयात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून आठ लाख रुपयांची फसवणूक केली. या पीडित महिलांनी जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे. विवाह संकेतस्थळांवरील प्रोफाइल्सवर लगेच विश्वास न ठेवता, त्यांची प्रत्यक्ष खात्री करून घ्यावी असे पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी अशा प्रकारच्या फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे.