जळगाव -: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज जळगाव दौऱ्यावर आहेत. काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्ष प्रतिभा शिंदे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत.
प्रवेश सोहळ्याच्या निमित्ताने समृद्ध खान्देश संकल्प मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. अजित पवार यांचा हा दौरा सुरु असतानाच जळगावमध्ये लावलेला एक बॅनर सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे. या बॅनरवर राष्ट्रवादीच्या धोरणांवर खोचक सवाल करणारा मजकूर झळकवला असून त्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जळगाव दौऱ्यापूर्वी शहरातील आकाशवाणी चौकात लावलेल्या एका बॅनरने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. “1999 पासून राष्ट्रवादी फक्त पश्चिम महाराष्ट्र तुपाशी, खानदेश-विदर्भ नेहमीच उपाशी… आता आमचा सवाल आम्ही का जावं तुमच्यापाशी? अजितदादा खानदेशवासियांची अपेक्षा पूर्ण करणार कशी?” असा खोचक मजकूर या बॅनरमध्ये झळकला. त्यामुळे हे बॅनर नेमके कोणी लावले याची चर्चा शहरात रंगली असून, अजित पवार गटाला उद्देशून विचारलेले हे सवाल सध्या चर्चेचा विषय ठरले आहेत.
दरम्यान, जळगावमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गट महिला शक्तीकडून सर्व धर्मीय लाडक्या बहिणींनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना राखी बांधून रक्षाबंधन साजरा केला. अजित पवारांच्या जळगाव दौऱ्याच्या कार्यक्रमाची सुरुवात रक्षाबंधनाने झाली. यावेळी जळगावमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आले.