जामनेर :- सुलेमान पठाण या युवकाला जामनेर येथे अत्यंत क्रूर पद्धतीने मारण्यात आले असून ही हत्या एक पूर्वनियोजित षडयंत्र असावे, ही हत्या सर्वसामान्य माणसांनी केलेली नसून प्रशिक्षित गुन्हेगारांनी थंड डोक्याने केली असावी, अशी शंका प्रसिद्ध साहित्यिक जयसिंग वाघ यांनी बोलून दाखविली. बीड, परभणी या ठिकाणी सुध्दा अत्यंत क्रूरता उफाळून आली व त्यातून हत्या करण्यात आलेली असल्याचे महाराष्ट्राने पाहिले आहे. मारेकऱ्यांचे राजकीय लागेबांध असल्याने पीडित लोकांना न्याय मिळत नाही. एकी कडं फुले, आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणायचे व दुसरीकडं अत्यंत क्रूर पद्ध्तीने इथल्या विशिष्ट समूहातील तरुणांची हत्या दिवसा ठवळ्या करायच्या असे चित्र निर्माण झाले आहे. हत्ये मधून केवळ एकच जीव जातो असे नाही तर अनेकांची तसेच मारेकऱ्यांची सुध्दा घरे उद्ध्वस्त होतात असेही वाघ यांनी स्पष्ट केले.
सुलेमान पठाण या मुस्लिम युवकाची हत्या झाली असता जयसिंग वाघ, वासंती दिघे , सरोजिनी लभाने, फईम पटेल, सागर साळुंके, इद्रिस मणियार ई. कार्यकर्ते जळगाव वरून बोरखेडी येथे सुलेमान च्या आई , वडिलांच्या भेटी करिता गेले असता सुलेमानचे वडील रहीम खान पठाण यांनी एकूण घटनेची माहिती देताना सांगितले की, सुलेमानला अत्यंत क्रूर पद्ध्तीने मारण्यात आले होते, त्याच्या अंगावरील जखमा अगणित होत्या, त्याच्या गुप्तांगावर सुध्दा जखमा होत्या, त्या नराधमांनी मला, माझ्या वृध्द वडिलांना, माझ्या पत्नीला सुध्दा बेदम मारले त्या सर्व मारेकऱ्यांनी क्रुरतेची परिसीमा गाठली होती. त्यांच्या या हिंसक कृत्याने परिसरात प्रचंड दहशत निर्माण झाली होती. सरकारने अश्या गुन्हेगारांना कठोरात कठोर शासन करावे जेणे करून पुन्हा निष्पाप तरुणांचा जीव जाणार नाही. रहीम पठाण यांनी दिलेल्या या माहिती मुळे अनेकांची मने हेलावून गेली होती.
या प्रसंगी प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या वासंती दिघे यांनी सर्व परिस्थिती समजून घेवून या प्रसंगात आम्ही खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभे आहोत असे सांगून आम्ही लवकरच जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांची भेट घेऊन सर्व परिस्थिती त्यांना सांगून तुम्हाला न्याय मिळवून देण्याचा कसोशीने प्रयत्न करू असे सांगितले. तसेच या प्रकरणी आपण धीर न सोडता न्यायालईन लढाई लढावी, आपण हा अन्याय असाच सहन केलातर असेच सुलेमान मारण्याची हिंमत वाढत जाईल असेही दिघे यांनी स्पष्ट केले. त्यांनी महिलांचे सांत्वन केले.
सरोजिनी लभाने यांनी या प्रकरणी सखोल चौकशी करून, खरे गुन्ह्येगार पकडुन त्यांना लवकरात लवकर व कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी केली.
या प्रसंगी संभाजी नगर येथून भा. क. प. चे उपाध्यक्ष सय्यद अनिस , सरचिटणीस ॲड. अभय टाकसाळ , मुंबई येथून भीमराज सेना प्रमुख राजुभाऊ थाटे व अन्य आठ ते दहा कार्यकर्ते आलेले होते. सय्यद अनिस यांनी सुलेमान च्या मारेकऱ्यांना सरकारने पाठीशी न घालता निःपक्षपाती चौकशी करून सर्वच्या सर्व आरोपींना फाशीची शिक्षा होईल अशीच भूमिका घ्यावी असे विचार व्यक्त केले. ॲड.अभय टाकसाळ यांनी उच्य न्यायालयाच्या देखरेखी खाली या प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी केली. राजू भाऊ थोटे यांनी आम्ही प्रसंगी रस्त्यावर येऊन लढाई लढू असे सांगितले. या प्रसंगी सुलेमान चे नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.