राज्यासह देशातील पावसाचा मुक्काम आता हळूहळू उरकत चालला असून मान्सून परतीच्या प्रवासाला निघाला आहे. विशेष बाब म्हणजे यंदा लवकर आला आणि लवकरच चालला आहे. नैऋत्य मान्सूनचा परतीचा प्रवास आज, १४ सप्टेंबरपासून पश्चिम राजस्थानमधून सुरू झाला आहे, जो सामान्य वेळेपेक्षा तीन दिवस अगोदर परतत आहे.
मान्सून परतीच्या वाटेवर असतानाच, राज्यात मात्र पावसाची शक्यता वाढली आहे. सध्या उत्तर तेलंगणा आणि लगतच्या विदर्भावर कमी दाबाचे क्षेत्र असून, एक कमी दाबाचा द्रोणीय पट्टा दक्षिण-मध्य महाराष्ट्रापर्यंत पसरला आहे. या हवामान प्रणालींमुळे पुढील काही दिवस राज्यात मान्सून सक्रिय राहणार आहे.
ऑरेंज आणि यलो अलर्ट
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात पुढील दोन दिवस बहुतांश ठिकाणी, तर मराठवाड्यात अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्याला ‘ऑरेंज अलर्ट’: रायगडमध्ये पुढील दोन दिवस आणि रत्नागिरीत उद्या मेघगर्जनेसह सोसाट्याच्या वाऱ्यासह तुरळक ठिकाणी अति जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.