भरवाड समाजाचा जेष्ठ श्री.अज्जूभाई मेहराभाई भरवाड सत्कार गौरव;“गोसेवा हीच ईशसेवा”– उमेश भैय्या सोनवणे
तळोदा :- वसुबारस या पवित्र पर्वाच्या निमित्ताने सेवाभावे प्रतिष्ठान, तळोदा तर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही श्रद्धा, भक्ती आणि पारंपरिक उत्साहात भव्य गोपूजन कार्यक्रम पार पडला. आज दिनांक १७ ऑक्टोबर २०२५ रोजी तळोदा येथे झालेल्या या उत्सव गायींचे पूजन करून त्यांना चना, डाळ, चणाडाळ व गूळ खाऊ घालून सन्मानपूर्वक पूजन करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात विश्व हिंदू परिषद जिल्हा कार्यकारिणी सदस्य प्रा.राजाराम राणे सर यांच्या हस्ते विधीवत गोपूजनाने करण्यात आली. यावेळी त्यांच्यासोबत श्री.अज्जूभाई मेहेराभाई भरवाड यांनीही पूजनात सहभाग घेतला.
यानंतर सेवाभावे प्रतिष्ठानचे अध्यक्ष उमेशभैय्या विजयसा सोनवणे यांच्या हस्ते गोसेवेत मोलाचे योगदान देणाऱ्या भरवाड समाजातील गोपालक बांधवांचा सन्मान करण्यात आला. या गौरवाने सन्मानित झालेल्यांमध्ये श्री.अजुभाई मेहेराभाई भरवाड, श्री.रणछोड बादशहा भरवाड, श्री.पिटु माया भरवाड, श्री.गोकुळ भरवाड, श्री.लाला भरवाड, श्री.राजू भरवाड यांचा सन्मान करण्यात आला. या प्रसंगी अध्यक्ष उमेश भैय्या सोनवणे म्हणाले,“आपल्या तळोद्यामध्ये सुमारे २००० ते २५०० देशी गीर गायी आहेत. त्या गायींचे पालनपोषण, संरक्षण व सांभाळ करणारे हे गोपालक रुपी भरवाड समाजाचे बांधव खऱ्या अर्थाने आपल्या संस्कृतीचे रक्षक आहेत. त्यांच्या त्याग, श्रम आणि गोप्रेमाबद्दल आपण सर्वांनी कृतज्ञता व्यक्त करायला हवी.”
कार्यक्रमाला विश्व हिंदू परिषद देवगिरी प्रांत विशेष संपर्कप्रमुख श्री.विजयराव सोनवणे, डॉ.शांतीलाल पिंपळे, श्री.मुकेश जैन, श्री.राजेश चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी प्रा. राजाराम राणे यांनी वसुबारस या दिवसाचे धार्मिक व सांस्कृतिक महत्त्व स्पष्ट करताना सांगितले की,“गाई म्हणजे आपल्या संस्कृतीचा केंद्रबिंदू आहे. तिच्या पूजनाने कुटुंबात समृद्धी, सुख व शांती नांदते.”या भव्य कार्यक्रमाचे नियोजन सेवाभावे प्रतिष्ठान, तळोदा चे संचालक श्री.शिरीष माळी, श्री.संतोष चौधरी, श्री.अनिल नाईक व श्री.अतुल पाटील यांनी उत्साहात केले.