रेल्वेत नोकरीचे आमिष ; सेवानिवृत्त वृद्ध वडिलांची लाखो रुपयात फसवणूक 

0
22

जळगाव -: रेल्वेमध्ये नोकरी लावण्याचे आमिष दाखवून एका ६७ वर्षीय सेवानिवृत्त नागरिकाची तब्बल १२ लाख ५० हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याची घटना जळगाव शहरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी गुरुवारी २० नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

सविस्तर वृत्त असे कि, फिर्यादी संतोष माणिक चौधरी (वय ६७, रा. निमखेडी शिवार, जळगाव) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, २१ फेब्रुवारी २०२१ ते ३१ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत ही फसवणूक झाली. शहरातील चिमुकले राम मंदिर, नवीन बसस्थानकसमोर आरोपींनी फिर्यादीचा विश्वास संपादन केला. यातील मुख्य आरोपी संदिप वसंत भोळे, दिपाली संदिप भोळे (दोघे रा. जिल्हापेठ, जळगाव) आणि त्यांचे साथीदार धिरज पांडुरंग मुंगलमारे (भंडारा) व अण्णा नामदेवराव गोहत्रे नागपूर) यांनी फिर्यादीचा मुलगा जगदिश संतोष चौधरी याला रेल्वेमध्ये नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवले. त्यासाठी आरोपींनी फिर्यादीकडून रोख आणि ऑनलाईन पद्धतीने १५ लाख रुपये स्वीकारले.

पैसे घेतल्यानंतर आरोपींनी जगदिश यांना रेल्वेमध्ये नोकरी लागल्याचा एक बनावट नियुक्ती आदेश देखील दिला. मात्र, प्रत्यक्षात नोकरी न लावता आणि दिलेले पैसे परत न करता, आरोपींनी केवळ २ लाख ५० हजार रुपये परत केले. उर्वरित १२ लाख ५० हजार रुपये परत न करता फिर्यादीची आर्थिक फसवणूक केली. या गंभीर प्रकाराबद्दल संतोष चौधरी यांनी २० नोव्हेंबर रोजी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. त्यानुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

Spread the love