दीपनगर (ता.भुसावळ) : भारतीय संविधान दिनाचे औचित्य साधून वंचित बहुजन कंत्राटदार संघटनेने सामाजिक दायित्वाची भूमिका बजावत दीपनगर येथील साने गुरुजी सार्वजनिक वाचनालयाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले तसेच त्यांच्या जीवनावर आधारित मौल्यवान पुस्तके भेट दिली.
यावेळी संघटनेचे अध्यक्ष प्रकाश सरदार, सचिव उस्मानखा पठाण, दिनेश इखारे, संतोष तेलंग व तोहसिब पठाण यांच्या हस्ते ही पुस्तके वाचनालयाचे सचिव राजेश पवार यांनी ही भेट स्वीकारली त्यावेळी सहसचिव तेजराव नाईक, संचालक सदस्य विजय वाघ,आणि ग्रंथपाल अलका पाटील , कर्मचारी प्रवीण बोदडे हे उपस्थित होते.
या पुस्तकांमुळे विशेषतः सर्व समाजातील वर्गाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार, संविधानाची निर्मिती प्रक्रिया आणि सामाजिक न्यायाची तत्त्वे जवळून समजण्यास मदत होईल, असा विश्वास संघटनेचे अध्यक्ष प्रकाश सरदार यांनी व उपस्थित पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
पुस्तके स्वीकारताना वाचनालयाचे सचिव राजेश पवार यांनी वंचित बहुजन कंत्राटदार संघटनेचे मनापासून आभार मानले. “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार ग्रामीण भागातील तरुण पिढीपर्यंत पोहोचवण्याचे हे उत्तम माध्यम ठरेल,” असे त्यांनी नमूद केले.
या छोटेखानी कार्यक्रमास वाचनालयाला संविधान दिनी केलेल्या या पुस्तक भेटीमुळे दीपनगरमध्ये वाचन संस्कृतीला चालना मिळाली असून, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा अधिकाधिक प्रसार होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.












