ऑनलाइन ट्रेडिंगच्या आमिषाने १९ लाखांची फसवणूक

0
26

जळगाव -: ऑनलाइन शेअर्स ट्रेडिंगमध्ये भरघोस नफा मिळेल,असे आमिष दाखवून भुसावळ येथील एका नागरिकाची तब्बल १९ लाख १ हजार ९९९ रुपयांची फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी नत्थू प्रजापती प्रसाद (वय ४९, रा. भुसावळ) यांनी सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी नत्थू प्रसाद यांच्या तक्रारीनुसार, ९ ऑगस्ट २०२५ ते २४ नोव्हेंबर या कालावधीत आरोपींनी अत्यंत योजनाबद्ध पद्धतीने ही आर्थिक फसवणूक केली. फिर्यादीला ‘५५७ एस-के स्ट्रॅटेजी क्लब’ आणि ‘डी३ स्ट्रॅटेजिक ट्रेडिंग ग्रुप’ अशा दोन ऑनलाइन ग्रुपमध्ये सामील करण्यात आले. या ग्रुपमध्ये प्रीती यादव, नीता जैन आणि ग्रुपचा अॅडमिन अॅडम सॅमनिओटिस यांनी शेअर्स ट्रेडिंगद्वारे मोठा नफा मिळवून देण्याचे आश्वासन दिले.

शेअर बाजारात कमी गुंतवणुकीत जास्त लाभ मिळतो, अशा प्रकारचे संदेश, चार्ट्स आणि खोट्या कमाईचे स्क्रीनशॉट्स दाखवून आरोपींनी फिर्यादीचा विश्वास संपादन केला. त्यानंतर वेळोवेळी विविध बँक खात्यांत ऑनलाइन पेमेंट करण्यास सांगितले. त्या आश्वासनांवर विश्वास ठेवून नत्थू प्रसाद यांनी तब्बल १९ लाख रुपयांहून अधिक रक्कम आरोपींकडे वर्ग केली.

मात्र, पैसे जमा झाल्यानंतर आरोपींनी कोणताही नफा न देता, मूळ रक्कमही परत करण्यास नकार दिला. व्यवहाराबाबत शंका निर्माण झाल्यानंतर नत्थू प्रसाद यांनी सायबर पोलिसांकडे धाव घेतली. तक्रारीवरून तिन्ही आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.

Spread the love