आणखी एक भोंदूगिरीचा चेहरा उघड;‘मी शंकर तू पार्वती’ म्हणत महिलेवर अत्याचार

0
3

नाशिक येथील अशोक खरात प्रकरणाची एसआयटी चौकशी सुरू असतानाच, आता वसईतील एका स्वयंघोषित भोंदू बाबाचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. स्वतःला शंकर म्हणवून घेत “मी शंकर तू माझी पार्वती आहेस” असे सांगत एका महिलेवर बलात्कार करणाऱ्या ऋषिकेश वैद्य याच्याविरुद्ध वसईच्या माणिकपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तात्काळ पावले उचलली असून, पुढील कायदेशीर कारवाईसाठी हे प्रकरण पुण्यातील मांजरी पोलिसांकडे वर्ग करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील 35 वर्षीय पीडित महिलेची 2023 मध्ये फेसबुकच्या माध्यमातून वसईतील ‘आमची वसई’ संस्थेचा प्रमुख आणि स्वयंघोषित धर्मगुरू ऋषिकेश वैद्य याच्याशी ओळख झाली होती. वैद्य याने महिलेच्या धार्मिक वृत्तीचा गैरफायदा घेत अध्यात्म शिकवण्याच्या बहाण्याने जवळीक साधली आणि डिसेंबर 2023 मध्ये पुण्यात तिची भेट घेतली. यावेळी आपण ‘महादेवाचा अवतार’ असून ‘तू माझी पार्वती आहेस’ असे भासवून त्याने महिलेला भुलवले आणि पुण्यातील मांजरी येथील एका लॉजमध्ये नेऊन तिला गुंगीकारक पदार्थ देऊन तिच्यावर अत्याचार केला. धक्कादायक बाब म्हणजे, या दरम्यान त्याने पीडितेचे अश्लील छायाचित्रेही काढली होती, ज्याचा वापर करून त्याने तिचे शोषण केल्याचे समोर आले आहे.

आरोपी ऋषिकेश वैद्य याने काढलेल्या अश्लील छायाचित्रांच्या आधारे पीडित महिलेला ब्लॅकमेल करून पुन्हा भेटीसाठी दबाव टाकला. मे 2025 मध्ये वसईतील ‘हॉटेल एक्सप्रेस इन’ येथे तिला बोलावून पुन्हा अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. मात्र, नाशिकच्या अशोक खरात प्रकरणाची बातमी समोर आल्यानंतर पीडितेने हिंमत एकवटून घडलेला प्रकार पतीला सांगितला. त्यानंतर बुधवारी संध्याकाळी वसईच्या माणिकपूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. बलात्काराची पहिली घटना पुण्यात घडल्याने तांत्रिक कारणास्तव हे प्रकरण पुढील तपासासाठी पुण्यातील मांजरी पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आले आहे.

माणिकपूर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक हिरालाल जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. पीडित महिलेने असाही खळबळजनक दावा केला आहे की, ऋषिकेश वैद्य याने स्वतःला धर्मगुरू भासवून अनेक मुलींना आपल्या जाळ्यात ओढले असून त्यांचे लैंगिक शोषण केले आहे. ‘आमची वसई’ या संस्थेचा बुरखा पांघरून अध्यात्माच्या नावाखाली चालणाऱ्या या धक्कादायक प्रकारामुळे परिसरात संताप व्यक्त होत असून, पोलिस आता इतर संभाव्य पीडितांचा शोध घेत आहेत.

Spread the love