पिक विम्यासाठी उमरीत उद्या रस्ता रोको; १८ गावांच्या शेतकऱ्यांना सुधाकर देशमुख धानोरकर यांचे आवाहन

0
5

उमरी | प्रतिनिधी उध्दव मामडे

धानोरा बु मंडळातील १८ गावांतील शेतकऱ्यांना अद्याप पिक विमा न मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संतापाची लाट पसरली आहे. याच पार्श्वभूमीवर उद्या दि. २ जून २०२६ रोजी उमरी येथील मामा चौकात भव्य रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा युवा नेतृत्व सुधाकरराव देशमुख धानोरकर यांनी केली आहे.

आज (दि. १ जून) तहसील कार्यालय उमरी येथे तहसीलदार भगत मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली तालुका कृषी अधिकारी, विमा कंपनीचे प्रतिनिधी आणि पोलीस निरीक्षक गुट्टे यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. मात्र, धानोरा मंडळातील १८ गावांना पिक विमा मंजूर करण्याबाबत कोणतेही ठोस अथवा सकारात्मक उत्तर न मिळाल्याने शेतकऱ्यांचा संताप आणखी वाढला आहे.

बैठकीत प्रशासन आणि विमा कंपनीकडून समाधानकारक भूमिका न घेतल्यामुळे नियोजित आंदोलन मागे घेण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे सुधाकरराव देशमुख धानोरकर यांनी स्पष्ट केले. उलट, आता शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरून आपल्या हक्कासाठी लढण्याची वेळ आल्याचे त्यांनी सांगितले.

उद्या सकाळी १०:३० वाजता मामा चौक, उमरी येथे धानोरा बु, वाघाळा, गणीपूर, बोळसा बु, बोळसा खुर्द, सावरगाव कला, हुंडा, बोथी, तुरटी, मंडळा, रामखडक, जिरोना, सोमठाणा यासह सर्व प्रभावित गावांतील विमाधारक शेतकऱ्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

“हक्काचा विमा मिळालाच पाहिजे; अन्यथा प्रशासन आणि विमा कंपनीला जाब विचारल्याशिवाय शेतकरी शांत बसणार नाही,” असा इशाराही सुधाकरराव देशमुख धानोरकर यांनी दिला आहे.

उद्या होणाऱ्या या आंदोलनाकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले असून प्रशासन काय भूमिका घेते याकडे शेतकऱ्यांचे डोळे लागले आहेत.

Spread the love