जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ : अनिल चौधरी यांचा उमेदवारी अर्ज दाखल

0
4

प्रतिनिधी –  जितेंद्र काटे

भुसावळ :- जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीसाठी भुसावळचे माजी नगराध्यक्ष अनिल चौधरी यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी विविध स्थानिक स्वराज्य संस्थांतील लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि समर्थक उपस्थित होते.

उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी भुसावळ येथून कार्यकर्ते व समर्थकांसह चौधरी जळगावकडे रवाना झाले. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातही समर्थकांची उपस्थिती पाहायला मिळाली.

यावेळी यावलचे नगराध्यक्ष अतुल पाटील, नगरसेवक कुर्बान शेख, नगरसेवक उल्हास पगारे, नगरसेवक सचिन पाटील यांच्यासह विविध भागांतील लोकप्रतिनिधी उपस्थित होते. ‘

उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना अनिल चौधरी यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांमधील लोकप्रतिनिधींच्या प्रश्नांना प्राधान्य देण्याची भूमिका मांडली. “माझ्या संपर्कात ४०० हून अधिक नगरसेवक असून त्यांच्याशी सातत्याने संवाद सुरू आहे. त्यांच्या सहकार्याच्या बळावर ही निवडणूक लढवत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधींचे प्रश्न विधान परिषदेत प्रभावीपणे मांडण्याचा प्रयत्न राहील,” असे त्यांनी सांगितले.

गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील विविध नगरपालिकांमधील नगरसेवक, नगराध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी वाढल्या असून, विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. विविध शहरांमध्ये झालेल्या बैठकींमुळे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील निवडणुकीची चर्चा अधिक रंगू लागली आहे.

जळगाव जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधींमध्ये सध्या विधान परिषद निवडणुकीबाबत उत्सुकता असून, आगामी काळात राजकीय घडामोडींना आणखी वेग येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Spread the love