जळगाव -: महाराष्ट्र राज्य सेवानिवृत्त शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व अधिकारी संघटना, जळगाव जिल्हा शाखेच्या वतीने पंचायत समिती जळगावचे गटविकास अधिकारी यांना निवेदन देऊन तालुका स्तरीय पेन्शन अदालत तातडीने आयोजित करण्याची मागणी करण्यात आली आहे.
संघटनेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सेवानिवृत्त शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या विविध पेन्शनविषयक समस्या प्रलंबित असून त्यांचे निराकरण करण्यासाठी नियमितपणे पेन्शन अदालत घेणे आवश्यक आहे. संबंधित विभागांकडून वेळोवेळी आश्वासने देण्यात आली असली तरी अनेक निवृत्त कर्मचाऱ्यांच्या अडचणी अद्याप कायम आहेत.
निवेदनानुसार, पेन्शनधारकांच्या समस्या सोडविण्यासाठी दरमहा किंवा नियोजित कालावधीत पेन्शन अदालत आयोजित करणे गरजेचे आहे. मात्र, अशा बैठका नियमित होत नसल्याने निवृत्त कर्मचाऱ्यांना विविध कार्यालयांचे वारंवार हेलपाटे मारावे लागत आहेत. त्यामुळे पेन्शन प्रकरणांचा त्वरित निपटारा करण्यासाठी प्रशासनाने विशेष लक्ष देण्याची आवश्यकता असल्याचे संघटनेने नमूद केले आहे.
संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी गटविकास अधिकाऱ्यांकडे निवेदन सादर करून प्रलंबित पेन्शन प्रकरणे मार्गी लावण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देण्याची मागणी केली. तसेच तालुका स्तरावर पेन्शन अदालत नियमितपणे आयोजित करून निवृत्त शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या अडचणींचे तात्काळ निराकरण करावे, अशी मागणीही करण्यात आली.
या निवेदनामुळे निवृत्त कर्मचारी व पेन्शनधारकांच्या प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधले गेले असून लवकरच याबाबत सकारात्मक निर्णय होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.












