एरंडोल, प्रतिनिधी : शहरातील काबरे विद्यालय व टेनिस क्लब परिसरात शनिवारी दुपारी झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वार युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून भरधाव अवजड वाहनांवर नियंत्रण आणण्यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील पुरा भागातील फकीरवाडा येथे राहणारे मुस्तकीम शहा रशीद शहा (वय ३५) हे शनिवारी दुपारी आपल्या दुचाकीने घरी जात होते. यावेळी म्हसावद-नेरी मार्गावरील काबरे विद्यालय व टेनिस क्लब परिसरात समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. अपघाताची तीव्रता इतकी भीषण होती की मुस्तकीम शहा यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
मयत मुस्तकीम शहा हे मिस्त्री कामासोबतच वाद्य वाजवण्याचा व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. त्यांच्या पश्चात आई, पत्नी व दोन मुली असा परिवार असून त्यांच्या आकस्मिक निधनामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
नागरिकांची प्रशासनाकडे मागणी
म्हसावद ते नेरी मार्ग हा शहरातील अत्यंत वर्दळीचा मार्ग मानला जातो. या परिसरात काबरे विद्यालय, टेनिस क्लब, महाविद्यालय, शाळा, बालवाडी तसेच नव्याने विकसित झालेल्या निवासी वसाहती असल्याने नागरिकांची मोठ्या प्रमाणात ये-जा असते. मात्र, या मार्गावर ट्रक, डंपर आणि इतर अवजड वाहने अनेकदा भरधाव वेगाने धावत असल्याने अपघातांचा धोका कायम निर्माण होत आहे.
या पार्श्वभूमीवर संबंधित मार्गावर गतिरोधक उभारणे, वेगमर्यादा दर्शविणारे फलक लावणे, वाहतूक नियंत्रण व्यवस्था मजबूत करणे तसेच पोलिसांचा नियमित बंदोबस्त ठेवणे आवश्यक असल्याची मागणी नागरिकांनी केली आहे. भविष्यात अशा दुर्दैवी घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी प्रशासनाने कठोर पावले उचलावीत, अशी भावना जनमानसातून व्यक्त होत आहे.
दरम्यान, अपघातग्रस्त ट्रक एरंडोल पोलीस ठाण्यात जमा करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.












