प्रतिनिधी – जितेंद्र काटे
भुसावळ – प्राथमिक आरोग्य केंद्र वराडसीम अंतर्गत येणाऱ्या गोजोरे आयुष्मान आरोग्य उपकेंद्राला राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानक (NQAS) अंतर्गत झालेल्या राष्ट्रीय मूल्यांकनामध्ये ७८.१९ टक्के गुण प्राप्त करून राष्ट्रीय गुणवत्ता पात्रता मिळाली आहे. या यशामुळे गोजोरे गावाचा गौरव वाढला असून गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवेच्या दिशेने टाकलेल्या प्रयत्नांना राष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली आहे.
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या NQAS मूल्यांकनामध्ये रुग्णाभिमुख सेवा, स्वच्छता, संसर्ग नियंत्रण, औषध व साहित्य व्यवस्थापन, नोंदवही व्यवस्थापन तसेच समुदाय सहभाग या विविध निकषांची तपासणी करण्यात आली. या सर्व निकषांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत आयुष्मान आरोग्य मंदिर, गोजोरे यांनी हे यश संपादन केले.या यशामागे समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. किरण पाटील यांची अथक परिश्रम, नियोजन आणि समर्पित कार्य महत्त्वाचे ठरले. तसेच आरोग्य सेवक राजेंद्र पवार व आरोग्य सेविका सौ. ललिता लोखंडे यांनीही गुणवत्ता उपक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष योगदान दिले.
ही उल्लेखनीय कामगिरी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राजू तडवी, तसेच वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रतीक तायडे आणि डॉ. प्रतीक्षा फालक यांच्या मार्गदर्शनाखाली साध्य झाली.
राष्ट्रीय गुणवत्ता पात्रता प्राप्त झाल्याबद्दल आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचारी, ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थांनी आरोग्य मंदिराच्या संपूर्ण चमूचे अभिनंदन केले आहे. भविष्यातही नागरिकांना अधिक दर्जेदार, रुग्णकेंद्रित आणि विश्वासार्ह आरोग्य सेवा देण्यासाठी कटिबद्ध राहणार असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
वास्तविक पाहता गोजोरे ग्रामपंचायत कार्यालयाच्या सरपंच सौ नंदा कोळी व उपसरपंच चंद्रकांत पाटील तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि सदस्य यांच्या मार्गदर्शनाखाली गावातील आशा सेविका तसेच या उपकेंद्राला जोडण्यात आलेल्या गावातील आशाताईंनी खरे तर गोजोरे गावाचे नाव नामांकित केले अशी प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ते व माजी सैनिक लक्ष्मण कोळी यांनी व्यक्त केली.












