धरणगाव, प्रतिनिधी : धरणगाव तालुक्यातील पाळधीनजीक सावदा-रिंगणगाव मार्गावर दोन दुचाकींची समोरासमोर भीषण धडक होऊन तिघांचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना सोमवारी (२२ जून) दुपारी सुमारे २ वाजेच्या सुमारास घडली. या अपघातामुळे परिसरात शोककळा पसरली असून तीन कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
या अपघातात किरण बाबूलाल राक्षे-मराठे (वय ३८, रा. पथराड, ता. धरणगाव), चेतन भिकन पाटील (वय ३५, रा. वाडेगुडे, ता. भडगाव) आणि प्रदीप उखा निकम (वय ४०, रा. गोंदेगाव-निंभोरा, जि. छत्रपती संभाजीनगर) यांचा जागीच मृत्यू झाला. तर बाबूलाल राक्षे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, किरण राक्षे हे पद्मालय येथे एका लग्न समारंभासाठी गेले होते. समारंभ आटोपल्यानंतर ते आपल्या वडिलांसह दुचाकीवरून घरी परतत असताना पाळधीनजीक समोरून येणाऱ्या दुसऱ्या दुचाकीशी त्यांच्या वाहनाची समोरासमोर जोरदार धडक झाली. धडक इतकी भीषण होती की तिन्ही जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना तत्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर किरण राक्षे, चेतन पाटील आणि प्रदीप निकम यांना मृत घोषित केले.
दरम्यान, चेतन पाटील आणि प्रदीप निकम हे मित्र असून नातेवाईकांना भेटून जळगावच्या दिशेने परतत असताना हा दुर्दैवी अपघात घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
या प्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात झिरो क्रमांकाने गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पाळधी पोलीस करीत आहेत.
या भीषण अपघातामुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून मृतांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. स्थानिक नागरिकांकडून मृतांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.












