प्रतिनिधी -जितेंद्र काटे
भुसावळ – सुनसगाव येथून जवळच असलेल्या नशिराबाद येथील हेडकर मोहल्ला परिसरात सिव्हिल हॉस्पिटलजवळील गजबजलेल्या भागात मध्यरात्री 3 वाजेच्या सुमारास लांडग्याने शिरकाव करून बकऱ्यांच्या पत्र्याच्या शेडवर हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. या हल्ल्यात तीन बकऱ्या आणि एक बोकड दगावल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे वनपाल उमाकांत कोळी, वनरक्षक हरीश थोरात (उमाळा) तसेच वनरक्षक स्वप्निल गोसावी (मेहरुण) यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. पंचांच्या उपस्थितीत नुकसानीचा पंचनामा करण्यात आला असून पुढील कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.
वन विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी जनावरे सुरक्षित ठिकाणी बांधावीत, तसेच परिसरात वन्य प्राण्यांची हालचाल दिसून आल्यास त्वरित वन विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन अधिकाऱ्यांनी केले.
या घटनेत नुकसान झालेल्या बकरी मालक शेख इरफान शेख नूर (रा. हेडकर मोहल्ला, नशिराबाद) यांच्या घराशेजारी असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये हा हल्ला झाला. घटनेची माहिती मिळताच नगरपरिषदेचे नगराध्यक्ष योगेश पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची माहिती घेतली तसेच उपनगराध्यक्ष पंकज महाजन हे कामानिमित्त बाहेरगावी असल्याने त्यांनी मोबाईल कॉल करून माहिती घेतली. तसेच वन विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून नुकसानग्रस्ताला शासनाच्या नियमानुसार आर्थिक मदत मिळण्यासाठी आवश्यक पाठपुरावा केला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
दरम्यान, या घटनेनंतर नशिराबाद परिसरात नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. अफवांवर विश्वास न ठेवता सावधगिरी बाळगावी आणि वन्य प्राण्यांबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास तत्काळ वन विभागाला कळवावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.











