प्रतिनिधी – जितेंद्र काटे
भुसावळ – सुनसगाव येथून जवळच असलेल्या रेणुका ज्येष्ठ नागरिक संघ, कुऱ्हा पानाचे यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात पोलीस उपअधीक्षक श्री. प्रशांत दरेकर यांनी ज्येष्ठ नागरिकांना मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या सुरक्षिततेबाबत सदैव सतर्क राहावे आणि आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन केले.
आजच्या काळात ज्येष्ठ नागरिकांना विविध प्रकारच्या फसवणुकींना सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे अनोळखी व्यक्तींवर सहज विश्वास ठेवू नये, मोबाईलवर येणारे संशयास्पद फोन, संदेश किंवा लिंक यांना प्रतिसाद देताना काळजी घ्यावी, तसेच कोणतीही वैयक्तिक अथवा आर्थिक माहिती अनोळखी व्यक्तींना देऊ नये, असे त्यांनी सांगितले.
तसेच घराबाहेर पडताना सुरक्षिततेची काळजी घेणे, संशयास्पद हालचाली आढळल्यास तातडीने पोलिसांना माहिती देणे आणि कोणत्याही अडचणीच्या प्रसंगी घाबरून न जाता कायदेशीर मदत घेणे आवश्यक असल्याचे श्री. दरेकर यांनी स्पष्ट केले.
“ज्येष्ठ नागरिकांचा अनुभव हा समाजाची मोठी ताकद आहे. मात्र सुरक्षित आणि निरोगी जीवनासाठी सतर्कता व काळजी ही तितकीच महत्त्वाची आहे,” असे त्यांनी आपल्या मार्गदर्शनपर संबोधनात सांगितले.
कार्यक्रमास रेणुका ज्येष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी, सदस्य तसेच परिसरातील ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमातून ज्येष्ठ नागरिकांमध्ये सुरक्षिततेबाबत जागरूकता निर्माण झाली. सूत्रसंचालन श्री. अरविंद बावस्कर आभार कळसकर सर यांनी केले.












