प्रतिनिधी – जितेंद्र काटे
भुसावळ – तालुक्यातील कुऱ्हा पानाचे येथील स्वस्त धान्य दुकानात गेल्या दोन महिन्यांपासून धान्य मिळत नसल्याने संतप्त झालेल्या नागरिकांनी अखेर आवाज उठवला. नागरिकांच्या सामूहिक तक्रारीची दखल घेत दि.२८ सप्टेंबर रोजी पुरवठा अधिकारी मा. रेवतकर मॅडम यांनी प्रत्यक्ष दुकानाला भेट दिली.
यावेळी नागरिकांनी आपल्या व्यथा मांडल्या. उन्हात महिला, वृद्धांना तासनतास उभे रहावे लागते, E-POS मशीनची पावती न देता हाताने लिहिलेल्या चिठ्ठ्या दिल्या जातात आणि 35 किलो धान्याऐवजी कमी धान्य दिले जाते, असे आरोप नागरिकांनी केले.
मा. रेवतकर मॅडम यांनी सर्व नागरिकांच्या तक्रारी शांतपणे ऐकून घेतल्या आणि याप्रकरणी चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यांच्या भेटीमुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
याप्रसंगी गावातील श्रीकांत बरकले योगेश पाटील अतुल पाटील अरविंद बावस्कर उत्तम काळे व इतर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.










