मारहाण करणाऱ्यांवर दखलपात्र गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी
पाचोरा : तालुक्यातील जारगाव ग्रामपंचायतीची ग्रामसभा २ ऑक्टोबर रोजी प्रशासक संदीप राठोड यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आली होती. या ग्रामसभेदरम्यान ग्रामस्थ आनंद सखाराम पाटील व माजी सरपंच सुनील युवराज पाटील यांच्यात शाब्दिक वाद झाला. त्यानंतर सुनील पाटील यांनी आनंद पाटील यांना मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणी आनंद सखाराम पाटील यांच्या खबरीवरून पाचोरा पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, मारहाण करणाऱ्यांविरुद्ध दखलपात्र गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात यावी, या मागणीसाठी आनंद सखाराम पाटील यांनी ६ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजेपासून पाचोरा पोलिस ठाण्यासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे.
आनंद पाटील यांनी केलेल्या मागण्यांमध्ये सुनील युवराज पाटील, भावेश सुनील पाटील व राहुल मधुकर पाटील यांच्याविरुद्ध जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी दखलपात्र गुन्हा दाखल करावा, सुनील पाटील व भावेश पाटील यांनी महिलेला मारहाण केल्याच्या प्रकरणाचा तपास करून दोषारोपपत्र तातडीने न्यायालयात दाखल करावे, तसेच सुनील युवराज पाटील यांची कृषी उत्पन्न बाजार समिती, पाचोरा येथील संचालक पदावरून हकालपट्टी करावी, अशा मागण्यांचा समावेश आहे.
याशिवाय, मुक्या प्राण्यांचा छळ केल्याच्या आरोपावरून सुनील पाटील यांच्याविरुद्ध वन्यजीव कायद्यान्वये कारवाई करावी, जारगाव ग्रामपंचायतीचे प्रशासक संदीप राठोड यांनी कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी कायदेशीर कारवाई करावी, तसेच सुनील पाटील यांच्याविरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्यांची स्वतंत्र चौकशी करून एम.पी.डी.ए. कायद्यान्वये कारवाई करावी, अशीही मागणी आनंद पाटील यांनी केली आहे.
मागण्या मान्य होईपर्यंत आमरण उपोषण सुरूच ठेवण्याची भूमिका आनंद पाटील यांनी घेतली असून, या प्रकरणी पोलिस प्रशासन काय भूमिका घेते, याकडे जारगाव ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.











