भुसावळ – (प्रतिनिधी) – तालुक्यातील वराडसिम गावात मूलभूत सुविधा व विकास कामांकडे होत असलेल्या दुर्लक्षा विरोधात सुज्ञ ग्रामस्थांनी आता आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. गावातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य, नागरिकांचे आरोग्य आणि सार्वजनिक सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या विकासकामांच्या मागणीसाठी १९ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी १० वाजेपासून ग्रामपंचायत कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
यासंदर्भात गट विकास अधिकारी, पंचायत समिती भुसावळ आणि पोलीस निरीक्षक, भुसावळ यांना निवेदन देऊन उपोषणाची पूर्वसूचना व आवश्यक परवानगी मागण्यात येणार आहे.
चार प्रमुख मागण्यांसाठी आंदोलन
गावातील युवकांना MPSC, UPSC, रेल्वे, पोलीस भरती व इतर स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी सुसज्ज अभ्यासिका उपलब्ध करून देणे, जिल्हा परिषद मुला-मुलींच्या व उर्दू शाळेच्या इमारतींची दुरुस्ती करून आवश्यक मूलभूत सुविधा पुरविणे, गावातील गटारी व नाल्यांची नियमित साफसफाई करणे तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी बसस्थानक, मुख्य चौक व सार्वजनिक ठिकाणी CCTV कॅमेरे बसविणे या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे.
प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे
गावाच्या विकासासाठी आवश्यक असलेल्या मूलभूत कामांकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध नसणे, शाळांच्या दुरुस्तीची गरज, अस्वच्छ गटारी आणि सार्वजनिक ठिकाणी सुरक्षेच्या उपाययोजनांचा अभाव यामुळे ग्रामस्थांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
गावातील विकासकामे नेमकी कधी पूर्ण होणार? संबंधित प्रशासन आणखी किती दिवस दुर्लक्ष करणार? असे प्रश्न उपस्थित केले जात असून दि.१८ ऑक्टोबर २०२६ पर्यंत मागण्या मान्य केल्या नाही तर १९ ऑक्टोबर पासून उपोषण सुरू करण्यात येणार असल्याचे अक्षय संतोष सपकाळे व ग्रामस्थांनी प्रसिद्धीसाठी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.










