भुसावळमध्ये दरोडेखोरांच्या टोळीवर पोलिसांचा छापा; शस्त्रसाठा जप्त!

0
2

गावठी कट्टा, जिवंत काडतुसे अन् मिरची पावडरसह तिघे जाळ्यात; अन्य तिघे पसार

भुसावळ प्रतिनिधी | शहरात चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण असतानाच दरोड्याच्या तयारीत असल्याचा संशय असलेल्या सहा जणांच्या टोळीवर बाजारपेठ पोलिसांनी धडक कारवाई केली. वांगोळा रोडवरील म्हाडा कॉलनी परिसरातील स्वामी विहारच्या प्रवेशद्वाराजवळ शुक्रवारी रात्री टाकलेल्या छाप्यात पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले, तर अन्य तिघे अंधाराचा फायदा घेत पसार झाले.

या कारवाईत गावठी कट्टा, दोन जिवंत काडतुसे, लोखंडी चाकू, स्टीलची फोल्डिंग स्टिक, मिरची पावडर, ३० फूट लांबीचा दोर आणि दोन दुचाकी असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

गुप्त माहितीने उघड केला संशयितांचा डाव

बाजारपेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक राहुल वाघ यांना काही संशयित दरोड्याच्या उद्देशाने एकत्र आल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी पंचांच्या उपस्थितीत स्वामी विहार परिसरातील प्रवेशद्वाराजवळ छापा टाकला. यावेळी दोन दुचाकींवर सहा संशयित आढळले. पोलिसांची चाहूल लागताच तिघांनी पळ काढला; मात्र पोलिसांनी तत्परतेने उर्वरित तिघांना ताब्यात घेतले.

शस्त्रांसह दोन दुचाकी जप्त

ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे रोहनसिंग सतनामसिंग चाचरा (वय २४), आर्यन सुनील मोरे (वय २२, दोघे रा. भिरूड हॉस्पिटलमार्ग, भुसावळ) आणि विशाल सुपडू ठाकरे (वय २०, रा. कन्हाळा बुद्रुक, ता. भुसावळ) अशी आहेत.

पोलिसांनी २५ हजार रुपये किमतीचा गावठी कट्टा, दोन हजार रुपये किमतीची दोन जिवंत काडतुसे, ५०० रुपये किमतीचा लोखंडी चाकू आणि ८०० रुपये किमतीची स्टीलची फोल्डिंग स्टिक जप्त केली. याशिवाय मिरची पावडर, ३० फूट लांबीचा दोर आणि एमएच १९ डीएफ १८७९ क्रमांकाची ६० हजार रुपये किमतीची तसेच एमएच १९ ईएम ०९१८ क्रमांकाची ७० हजार रुपये किमतीची अशा दोन दुचाकी पोलिसांनी ताब्यात घेतल्या.

पसार झालेल्या तिघांचा शोध सुरू

या कारवाईनंतर पसार झालेल्या अन्य तीन संशयितांचा शोध पोलिसांकडून सुरू आहे. संशयितांचा नेमका उद्देश काय होता आणि ते कोणत्या गुन्ह्याच्या तयारीत होते, याबाबत पुढील पोलीस तपासातून अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

Spread the love