जळगाव -जिल्ह्यात सन 2021-22 वर्षांसाठी खाजगी शाळांनी मनमानी फी घेण्याच्या आणि फी न भरल्यामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाईन वर्गातून काढून टाकल्याचा प्रकार होत असल्याने पालकांच्या तक्रारी वाढल्या आहेत.
पालकांना यासंदर्भात दिलासा मिळावा, म्हणून महाराष्ट्र स्टुडंट्स युनियनचे जळगाव विभाग प्रमुख अॅड. अभिजीत रंधे यांनी आवाज उठविल्याने शिक्षणाधिकार्यांनी याप्रकरणाची दखल घेऊन ज्या शाळांमध्ये सक्तीने वाढीव शैक्षणिक फी आकारणी करणार्या शाळा प्रशासनांवर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा प्राथमिक शिक्षणाधिकारी भाऊसाहेब अकलाडे यांनी दिला आहे.
शिक्षणाधिकार्यांच्या या आदेशाने वाजवी फी आकारणी करणार्या शाळांना लगाम बसणार आहे.
मार्च,एप्रिल आणि मे महिन्यात जिल्ह्यात कोरोना महामारीच्या दुसर्या लाटेमध्ये उद्रेक वाढला होता.
त्यामुळे सन 2021-22 वर्षांसाठी 16 जूनपासून ऑनलाईन शिक्षण सुरु करण्यात आले आहे. आता मात्र, कोरोनाची दुसरी लाट ओसरत असून रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणात घटली आहे.
त्यामुळे इयत्ता 8 वी ते 12 वीपर्यंतच्या शाळा सोशल डिस्टन्सिंगचे पालन करुन उघडण्यात आलेले आहेत. तर इयत्ता पहिली ते सातवीपर्यंत शाळांमध्ये ऑनलाईन शिक्षण सुरु आहे.
मात्र, शाळा प्रशासनाकडून शैक्षणिक फी आकारणी सक्तीने केली जात असून ज्या पाल्याने फी भरलेली नाही. अशा विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणातून लेफ्ट करण्यात येत असल्याच्या पालकांच्या तक्रारी वाढल्या आहेत.
त्यावर शिक्षणाधिकार्यांनी जळगाव जिल्ह्यातील शाळा प्रशासनाला सूचना वजा नोटीस देवून समज देण्यात आलेली आहे.
तरीही काही शाळांमध्ये सक्तीने शैक्षणिक फी आकारणी करणार्यात येत असेल, तर त्या शाळा प्रशासनावर कडक कारवाई करण्याचा इशारा शिक्षण विभागाने दिला आहे.
काय आहे नियम
शैक्षणिक वर्ष सन 2021-22 या करिता महाराष्ट्र शैक्षणिक संस्था शुल्क नियंत्रण विनियमन अधिनियम 2011 मध्ये मनूद केल्याप्रमाणे शैक्षणिक शुल्क पालक-शिक्षक संघामार्फत व पालकांना विश्वासात घेऊन शुल्क निश्चित करावे.
त्याचप्रमाणे शिक्षण शुल्काव्यतिरिक्तइतर शुल्क आकारणी जसे की, क्रीडांगण फी, स्नेह संमेलन फी, वाचनालय फी, प्रयोगशाळा फी, अल्पोहार फी, बस फी इतयादी सारखे जे उपक्रम, सुविधा सध्यास्थितीत राबविले किंवा पुरविले जात नाही.
अशा अतिरिक्त शुल्काची आकारणी करु नये. विद्यार्थ्यांचे प्रवेशासंदर्भात पालक किंवा विद्यार्थी यांची लेखी अथवा तोडी परीक्षा घेऊ नये.विद्यार्थ्यांना प्रवेश देताना शाळांनी कोणत्याही प्रकारची देणगी फी घेऊ नये.
पुनर्प्रवेश फी घेउ नये,शैक्षणिक शुल्क आकारण्याबाबत सवलत किंवा मुदत वाढ देण्यात यावी. शाळांनी वह्या,पुस्तके, सॉक्स-शुज,दप्तरे, इत्यादी शैक्षणिक साहित्याची, गणवेशाची विक्री करु नये किंवा विशिष्ट दुकानातूनच खरेदी करण्याची सक्ती करु नये.
चालू वर्षी गणवेश बदलू नये. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क भरले नाही या कारणाने कोणत्याही विद्यार्थ्यांचे ऑनलाइन शिक्षण बंद करु नये.
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्षातील वार्षिक निकालपत्र,गुणपत्रक, शाळा सोडल्याचा दाखला इत्यादी अडवू नये. शैक्षणिक शुल्क आकारणी, शैक्षणिक साहित्य, गणवेश खरेदी इत्यादी कारणास्तव पालकांवर व विद्यार्थ्यांवर मानसिक दबाव आणू नये. या नियमांचे उल्लंघन केल्यास त्या शाळांवर कारवाई करण्यात येईल
शालेय फी आकारणीबाबत यापूर्वीच सूचना देण्यात आलेल्या आहेत. कोरोना कालावधीचा विचार करुन शालेय फी संदर्भात शासनाने दिलेल्या निर्देशानुसार फी आकारणी करण्याचे निर्देश संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांना देण्यात आले आहे. नियमांचे उल्लंघन करणार्यांवर कारवाई करण्यात येईल.
बी.एस.अकलाडे, प्राथमिक शिक्षणाधिकारी