मातोश्रीबाहेर शिवसैनिकांची गर्दी पाहून उद्धव ठाकरे गाडीतून खाली उतरले; हात जोडत मानले सर्वांचे आभार

0
15

राज्यात सध्या मशिदींवरील भोंग्यांचा वाद तापलेला असताना शिवसैनिक आणि राणा दांपत्य हनुमान चालिसावरुन आमने-सामने आलं आहे. राणा दांपत्याने ठाकरे कुटुंबीयांचं निवासस्थान असलेल्या मातोश्रीबाहेर येऊन हनुमान चालिसा पठण करण्याचा इशारा दिल्यापासून शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. राणा दांपत्याला धडा शिकवण्याच्या हेतूने मोठ्या प्रमाणात शिवसैनिक मातोश्रीबाहेर जमा झाले होते. या शिवसैनिकांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आभार मानले आहेत. दरम्यान शिवसैनिक आज रात्री मातोश्रीबाहेर जागता पहारा देणार असल्याचं महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितलं आहे.

शिवसेना भवनाबाहेर शिवसैनिकांसोबत पक्षाचे अनेक मोठे नेतेही उपस्थित होते. यावेळी राणा दांपत्याविरोधात घोषणाबाजी केली जात होता. याचवेळी दुपारी ४.३० च्या सुमारास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची गाडी मातोश्रीबाहेर आली. शिवसैनिकांची गर्दी पाहून उद्धव ठाकरे तिथेच गाडीतून खाली उतरले आणि हात जोडत शिवसैनिकांचे आभार मानले. यानंतर ते चालत मातोश्रीच्या दिशेने गेले.

राणा दांपत्याला पोलिसांची नोटीस

उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान असणाऱ्या मातोश्रीबाहेर हनुमान चालिसा पठण करणार असल्याचं त्यांनी राणा दांपत्याने जाहीर केलं होतं. यानंतर त्यांना अमरावतीमध्येच रोखण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न होता. पण त्यांना गुंगारा देत राणा दांपत्य रात्रीच मुंबईतील खास निवासस्थानी दाखल झालं होतं.

कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने खेरवाडी पोलिसांनी राणा दांपत्याला त्यांच्या घरी जाऊन नोटीस बजावली.

मातोश्री बंगला हा मुख्यमंत्र्यांचं खासगी निवासस्थान आहे. परिसरात अनेक शासकीय कार्यालये आणि इतर अतीमहत्त्वाची आस्थापने आहेत. तसंच याठिकाणी नेहमीच वर्दळ असते. तसंच धरणे, आंदोलने, रॅली, संप, निदर्शने असे कार्यक्रम फक्त आझाद मैदानात करण्याचा आदेश उच्च न्यायालयाकडून देण्यात आला आहे. त्यामुळे परिसरात आंदोलन अथवा निषेध करू नये. यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशा आशयाची नोटीस खेरवाडी पोलिसांकडून राणा दांपत्याला बजावण्यात आली आहे.

शनिवारी हनुमान चालिसा पठण कऱणार

अमरावतीचे आमदार रवी राणा यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं की, “महाराष्ट्रावर आलेल्या संकटाच्या मुक्तीसाठी आम्ही मातोश्रीवर हनुमान चालिसा पठण करणार आहोत. उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाचं नाव घेत वारंवार मत मागितली आहेत. पण तेच आता हिंदुत्वाचा विरोध करत आहेत. राज्यातील सत्ता मिळताच त्यांना हिंदुत्वाचा विसर पडला आहे. त्यामुळे त्यांना जागं करण्यासाठी आम्ही मातोश्रीवर हनुमान चालिसा पठण करणार आहोत. उद्या सकाळी नऊ वाजता मातोश्रीवर जाणार आहोत”.

“बाळासाहेब ठाकरे आता हयात असते, तर त्यांनी आमचं स्वागत केलं असतं. एकवेळ नव्हे तर, शंभर वेळा हनुमान चालिसा पठण करा, असं ते आम्हाला म्हणाले असते. पण शिवसेनेला सध्या बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचा विसर पडला आहे. याचीच जाणीव करून देण्यासाठी आम्ही उद्या सकाळी नऊ वाजता मातोश्रीवर जाऊन हनुमान चालिसा पठण करणार आहोत. आम्ही कायदा सुव्यवस्था पालन करू, मुंबईकराना कुठलही त्रास देणार नाही”, असं रवी राणा यांनी म्हणाले.

“राज्यात वीज टंचाई, बेरोजगारी आणि शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. या प्रश्नांवर उद्धव ठाकरे काहीच बोलत नाहीत. या सर्व प्रश्नांची आठवण करून देण्यासाठी आम्ही हनुमान चालिसा पठण करणार आहोत. बाळासाहेबांच्या विचारांचे शिवसैनिक असते, तर त्यांनी आमचा विरोध केला नसता,” असं नवनीत राणांनी पत्रकार परिषदेत म्हटलं. यावेळी संजय राऊतांबद्दल प्रश्न विचारला असता, संजय राऊत हे पोपट आहेत. ते दररोज सकाळी पत्रकारांना बोलावून बडबड करत असतात, अशी बोचरी टीका नवनीत राणा यांनी केली आहे.

Spread the love