राणा दाम्पत्याने आता जेलमध्ये हनुमान चालीसा पठण करावी

0
14

आमदार, खासदारांच्या माध्यमातून धार्मिक उद्रेक घडवून राज्य उलवण्याचा प्रयत्न सुरू आहे. धार्मिक कार्याला कोणी विरोध करत नाही. मात्र, राणा दाम्पत्याचा हट्ट होता, मातोश्रीसमोर हनुमान चालीसा पठण करण्याचा. तुम्ही तुमच्या घरात हनुमान चालीसा पठण करा. सभागृह भाडय़ाने घेऊन त्यामध्ये म्हणा, देवेंद्र फडणवीस यांच्या घरी म्हणा. मातोश्रीवर अट्टाहास कशासाठी? राणा दाम्पत्याच्या खांद्यावर बंदुक ठेवून बार उडवला जात आहे. पण गोळी काही निशाण्यावर लागत नाही. आता त्यांनी जेलमध्ये निवांत हनुमान चालीसा पठण करावी, असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.

राऊत म्हणाले, धर्माच्या नावाने कोणीही असं घाणेरडं राजकारण करु नये. लोकप्रतिनिधी पक्षाच्या मदतीने अशा प्रकारचे काम करत असतील, तर राजद्रोहाचा गुन्हा दाखल होतो. त्यामुळे राणा दाम्पत्यावर लावण्यात आलेला राजदोहाचा गुन्हा योग्यच आहे. कारण लोकांना भडकावून राज्य अस्थिर करण्याचं काम त्यांनी केलं. दंगलसदृश्य परिस्थिती निर्माण करायची आणि राज्यपालांना सांगून राष्ट्रपती राजवटीची शिफारस करायची, असा त्यांच्या पक्षाचा प्रयत्न होता.

राणा दाम्पत्य म्हणजे काय टॉलस्टॉय आणि त्याची बायको नाही. त्यामुळे पोलिसांनी लावलेली कलमं योग्यच आहेत. सदावर्ते प्रकरणातही हेच झाले. त्यावेळी शरद पवार यांच्या घरावर हल्ला झाला. आता मातोश्रीवर हल्ला करण्याचा प्रयत्न होता. या सगळय़ामागे मोठे षडयंत्र असल्याचेही राऊत म्हणाले.

Spread the love