राज्यातील अनेक भागात मुसळधार पावसाचा इशारा

0
12

देशात अनेक भागात पावसाने हजेरी लावली आहे. राज्यातही अनेक भागात गेल्या दोन दिवसात पाऊस झाला आहे. यंदा वेळेआधीच मान्सून दाखल होणार असल्याची माहिती भारतीय हवामान विभागाने दिली होती. दरम्यान काल मान्सूनने अरबी समुद्रात एंट्री केली असल्याचे हवामान खात्यानं सांगितलं होतं.

IMD ने दिलेल्या माहितीनुसार दक्षिण मध्य महाराष्ट्र, दक्षिण कोकण आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये विजा आणि सोसाट्याच्या वाऱ्यांसह पाऊस होण्याची शक्यता आहे.

हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद या ठिकाणी 19 मे ते 21 मे दरम्यान विजांच्या कडकडाटा वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. कालपासून या प्रदेशातील काही ठिकाणी पावसाने रिपरिप सुरु केली आहे..

पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, साताऱ्याच्या काही भागांत पाऊस झाला असून पुण्यातल्या काही भागातही तुरळक पावसाने हजेरी लावली आहे. जालना जिल्ह्यातल्या काही भागांमध्ये काल संध्याकाळी अचानक विजेचा गडगडाट आणि वादळी वाऱ्यासह पाऊस बरसला आहे. त्यामुळे या पावसामुळे शेतकऱ्यांची मात्र चिंता वाढली आहे.

गेल्या 24 तासांत महाराष्ट्रातील या भागांत पाऊस सुरु असून पावसाच्या नोंदीसंदर्भात भारतीय हवामान खात्याने माहिती दिली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील काही प्रदेशात पावसाची नोंद झाली आहे ती पुढीलप्रमाणे, मोहोळ -19, सांगोला – 23, माढा – 2.4, हातकणंगले – 48, गडहिंग्लज – 35, राधानगरी – 19, आजरा – 68, शिरोळ – 48, शाहूवाडी – 9, पन्हाळा – 40, गगनबावडा – 47, चंदगड – 55. कोकण प्रदेशातील – खेड – 8, लांजा – 13, चिपळूण – 18, देवरुख – 8, राजापूर – 3, मंडणगड – 0, पारनेर -21, राहुरी -1.6, पाऊसाची नोंद झाली आहे.

पावसाची आजची स्थिती

आज केरळ आणि तामिळनाडूजवळ पावसाचे ढग दिसत नाहीत. दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्रसह मराठवाडा आणि संपूर्ण गोव्यासह कर्नाटकच्या बहुतांश भागांत आणि अरबी समुद्रावर काही भागात ढगाळ वातावरण आहे. तसेच मुंबई आणि ठाण्यातही अंशत: ढगाळ वातावरण असणार आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे

Spread the love